अधिकाऱ्यांनो वस्तू खरेदीच्या वेळेबाबत प्रबोधन करा : डॉ. राजेंद्र भारुड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

एकाचवेळी खरेदीसाठी गर्दी करू नये, तसेच वस्तूंचा अतिरिक्त साठादेखील करू नये. स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी यांनी समन्वयाद्वारे दुकानांची वेळ निश्चित करून नागरिकांना त्याची माहिती द्यावी.

नंदुरबार : ‘करोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश पुढील २१ दिवस अर्थात १४ एप्रिल २०२० रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. 

एकाचवेळी खरेदीसाठी गर्दी करू नये, तसेच वस्तूंचा अतिरिक्त साठादेखील करू नये. स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी यांनी समन्वयाद्वारे दुकानांची वेळ निश्चित करून नागरिकांना त्याची माहिती द्यावी. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जिल्ह्यात येण्यास व बाहेर जाण्यास अनुमती देण्यात आली आहे. अशा वस्तूंच्या वाहतूलिकीत काही अडथळे आल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपल्या वाहनांवर ‘अत्यावश्यक सेवा’ असे ठळकपणे दिसणारे स्टीकर लावावे. 

उगाच बाहेर फिरू नका 
नागरिकांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे व अनावश्यक बाहेर फिरू नये. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटना, केंद्र व राज्य सरकार यांच्यामार्फत आलेल्या सूचनांचे पालन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्णत: खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील डॉ.भारूड यांनी केले आहे. 

२०० होमगार्डची सेवा घेणार 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पोलिसांमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिसांना सहकार्यासाठी २०० होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात संचारबंदीची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी होमगार्डची सेवा उपयोगी ठरणार आहे. 
 
वैयक्तिक सुरक्षेची साधने 
जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन केंद्रात बाहेरच्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेल्या संशयित व्यक्तिंना ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत क्वॉरंटाईन व्यक्तिंचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. भविष्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास व संसर्ग वाढल्यास आवश्यक तयारीचा भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षेच्या साधनांची पुरेशा प्रमाणात तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी यंत्रणेला दिले. चेहऱ्याचे आच्छादन, गॉगल, मास्क आदी आवश्यक साहित्य आयसलेशन सेंटरच्या ठिकाणी उपलब्ध असावे असे त्यांनी सांगितले. 
 
ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी फवारणी करून निर्जतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना वैयक्तिक व परिसराची स्वच्छता राखण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. काही ठिकाणी स्थानिक भाषेतून संदेश देण्यात येत आहे. घंटागाडी व रिक्शद्वारे संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहनदेखील करण्यात येत आहे. बाहेरील जिल्हा अथवा राज्यातून आलेल्या प्रवाशांचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रबोधन करण्यात येत असून त्यांना आवश्यक दक्षता बाळगण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district collector Instructions officers corona virus