esakal | आपु गावुमा शिबिर लागणारो हाय..!

बोलून बातमी शोधा

null

आपु गावुमा शिबिर लागणारो हाय..!

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : ‘नंदुरबार, जिल्हामेनें दादा, बाया अने बाठा लोकुल नमस्कार, आपुले मालुम हाये, नंदुरबार जिल्हामा कोरोना बिमारी लागून खूब वादी गिली हाय. ते लोकांखातूर सरकार मेहनत कोई रिहा हाय, त्याखातुर कोरोना लस टोची लिवुनी जरूरी हाय. त्याय केल्होज खराब दुष्परिणाम देख्यो न्हा, एखादाल कोरोना बिमारी लागी किमान जहाकी त्रास होयो न्हा, आपु गावमा शिबिर लागणारो हाय, तीही लसीकरण कोही लेजा. इही मांतर्फे बठाल विनंती हाय’, असे स्थानिक पावरा बोली भाषेतूनच थेट आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील जनतेला करत लसीकरणाबाबतचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड व अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. जिल्ह्यातील जनतेला वेळोवेळी फेसबुकच्या माध्यमातून लाइव्ह मार्गदर्शन करून जनतेमधील कोरोनाविषयी भीती, जनजागृती, रेमडेसिव्हिरविषयी माहिती यांसह कोरोनावर मात करण्यासाठी केले जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये राज्यात तुलनेत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. ऑक्सिजनची टंचाई भासू दिली नाही तर शासकिय रुग्णालयात रेमडेसिव्हिरचा तुटवडा होऊ दिला नाही. कोविड साखळी तोडण्यासाठी डॉ. भारूड हे स्वतः वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहेत. त्यांचे फेसबुक लाइव्ह मार्गदर्शनानंतर आज थेट जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या स्थानिक पाच बोलीभाषेतूनच व्हाइस क्लिप तयार करून ग्रामीण जनतेला लसीकरणाबाबत आवाहन केले.

सोबतच ग्रामीण जनतेमध्ये लसीकरणाबाबत पसरलेले अफवांचे लोण व त्यामुळे निर्माण झालेले गैरसमज दूर करीत लसीकरणाचा फायदा पटवून देत गावोगावी होणाऱ्या लसीकरण शिबिरात जाऊन ग्रामस्थांनी लसीकरण करून घेण्याची विनंती केली आहे. जिल्‍ह्यात धडगाव -अक्कलकुवा परिसरात बोलली जाणारी पावरी-मथवाडी भाषा, तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बोलली जाणारी आदिवासी भाषा, नंदुरबार तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात बोलली जाणारी अहिराणी भाषा व कोकणीसह मराठी भाषेतून क्लिपद्वारे लसीकरणाबाबचे गैरसमज दूर करीत लसीकरण करून घेण्याचे आवाहन व विनंती डॉ. भारूड यांनी केले आहे. त्या मुळे सोशल मीडियावर त्यांचे स्थानिक बोलीभाषेतून केलेली जनजागृतीचे आवाहन हिट ठरले आहे. ग्रामीण नागरिक कुतूहलतेने ते ऐकत असून, एवढा मोठा अधिकारी आपल्या भाषेतून बोलत असल्याचे त्यांना कौतुक वाटत आहे. त्या मुळे हा विषय चर्चेचा ठरला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे