कोरोना नियंत्रणासाठी नंदुरबार जिल्ह्यात संचारबंदी लागू ः जिल्हाधिकारी भारूड 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास परवानगी असणार नाही. अशा अत्यावश्‍यक कामासाठी जाताना टॅक्‍सी किंवा खासगी वाहनात चालक आणि इतर दोन व्यक्तींना परवानगी असेल, तर रिक्षाचा उपयोग करताना चालक आणि एका व्यक्तीस परवानगी असेल.

नंदुरबार  : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार जिल्ह्यात आज (२३ मार्च २०२०) मध्यरात्रीपासून ३१ मार्च २०२० पर्यंत मनाई आदेश दिले आहेत. 

या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व सीमा येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात येतील. कोणत्याही खासगी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि अत्यावश्‍यक सेवेशी संबंधीत वाहनांना फिरण्यास परवानगी असेल. जिल्ह्यातील नागरिकांना केवळ वैद्यकीय कारणासाठी किंवा जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्यास परवानगी असेल. पोलिसांनी विचारणा केल्यावर योग्य कारण सांगावे लागेल व त्याचा पुरावा सोबत ठेवावा लागेल; अन्यथा कारवाई करण्यात येईल. अशा योग्य कारणांसाठी बाहेर पडल्यानंतरही नागरिकांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास परवानगी असणार नाही. अशा अत्यावश्‍यक कामासाठी जाताना टॅक्‍सी किंवा खासगी वाहनात चालक आणि इतर दोन व्यक्तींना परवानगी असेल, तर रिक्षाचा उपयोग करताना चालक आणि एका व्यक्तीस परवानगी असेल. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी प्रवाशांच्या वाहतुकीला परवानगी असेल. सामान्य कामकाजासाठी ही परवानगी असणार नाही. जिल्ह्यात बाहेरील राज्याच्या बस किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसची वाहतूक बंद असणार आहे. बॅंक, विमा, एटीएम, मुद्रित आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमे, पोस्ट आणि इंटरनेट सेवा, जीवनावश्‍यक वस्तूंसाठी ई-कॉमर्स, खाद्यपदार्थांची घरपोच सेवा, जीवनावश्‍यक वस्तू, रुग्णालये, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, खासगी सुरक्षा सेवा, कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करणाऱ्या आस्थापना, औषधे, दूध, बेकरी, अन्नधान्य, कृषिनिविष्ठा, पशुखाद्य, पशूंच्या दवाखान्यांशी संबंधीत आस्थापना व वाहतूक सुरू राहील. इतर सर्व व्यावसायिक आस्थापना या कालावधीत बंद राहतील. 

सर्व धार्मिक स्थळाच्या ठिकाणी प्रवेश बंद असेल. त्या ठिकाणी केवळ नियमित पूजा-अर्चेसाठी पुजाऱ्यांना किंवा केवळ संबंधीत व्यक्तीस परवानगी असेल. सर्व प्रकारचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, जत्रा, उरूस, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर स्पर्धा यांना मनाई राहील. शासकीय कार्यालये व इतर परवानगी दिलेल्या आस्थापनांनी सूचनेनुसार किमान कर्मचारी ठेवावेत व दोन व्यक्तींमध्ये आवश्‍यक अंतर राहील, याची दक्षता घ्यावी. अशा ठिकाणी हात धुण्याची व सॅनिटायझर्सची व्यवस्था करण्यात यावी. जनतेला अत्यावश्‍यक सेवा देण्यासाठीच ही कार्यालये सुरू राहतील. दुकाने, सेवा आस्थापना, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्रीडांगणे, मैदाने, तरणतलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खासगी क्‍लासेस, व्यायामशाळा, संग्रहालये बंद राहतील. राहत्या घरी क्वॉरंटाइन केलेली व्यक्ती बाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व अशा व्यक्तीला शासकीय क्वॉरंटाइनच्या स्थळी हलविण्यात येईल. नागरिकांनी अनावश्‍यक घराबाहेर फिरू नये व कोरोना नियंत्रणात प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणरी व्यक्ती भारतीय दंडविधान संहिता १८६ च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Nandurbar district has been banned for Corona control