रेशन दुकानदार मारतोय धान्यावर डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

ब्राम्हणपुरी : आडगाव (ता.शहादा) येथील रेशन दुकानात कमी धान्य मिळत असल्याने लाभार्थी गावकऱ्यांनी रेशन धान्य वाटप बंद पाडले. तहसीलदारांनी चौकशी करावी ,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

ब्राम्हणपुरी : आडगाव (ता.शहादा) येथील रेशन दुकानात कमी धान्य मिळत असल्याने लाभार्थी गावकऱ्यांनी रेशन धान्य वाटप बंद पाडले. तहसीलदारांनी चौकशी करावी ,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 
आडगाव येथील रेशन दुकानदार पी. एस. रावताळे यांनी आज सकाळी धान्य वाटप करण्यास सुरुवात केली असता लाभार्थ्यांना दिलेले धान्य लाभार्थी घरी घेऊन जात होती. त्यातील एक लाभार्थ्याने घरी धान्य मोजले असता प्रत्येक धान्यामागे किमान २ किलो धान्य कमी निघाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. या वेळी ग्रामस्थ हे धान्य वाटप होत असलेल्या ठिकाणी जाऊन तेथेच लागलीच मोजणी झालेले धान्य तपासले असता लाभार्थी युवराज जऱ्या वाघ याला वीस किलो तांदूळ दिले होते. ते पुन्हा मोजले असता १८ किलो आठशे ग्रॅम एवढे भरले. तसेच १० किलो गहू हे ८ किलो आठशे ग्रॅम एवढेच निघाले. दिवाण सुकऱ्या खर्डे यांनीही १६ किलो तांदूळ घेतले होते. ते १४ किलो सातशे ग्रॅम एवढेच भरले. विशेषतः हे सर्व धान्य त्याच रेशन दुकानात जाऊन त्याचाच वजन काट्यावर मोजण्यात आले. या संबंधी गावकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत दुकानाजवळ एकच गर्दी केली होती. रेशन दुकानदार पोस मशिनातील पावत्याही देत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. फेर मोजणी केलेल्या व कमी भरलेले धान्य व वजन काटा गावकऱ्यांनी ताब्यात घेऊन ग्रामपंचायतीच्या खोलीत टाळे बंद केले आहे. वरिष्ठ अधिकारी आल्यावर त्यांना दाखवू ,असा पवित्रा घेतला आहे. ऐन होळीच्या उत्सववेळी या आदिवासी भागात सर्व कुटुंबे जमतात व उत्सव साजरा करतात. शासनाच्या मदतीचा जर कोणी असा डल्ला मारत असेल तर त्याहून दुर्भाग्य ते काय, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. यावेळी उपसरपंच परशुराम सुकराम ठाकरे ,मोतिसिंग जयराम खर्डे, मुडसिंग डुंमऱ्या ठाकरे, सुनील उदेसिंग वाघ, राजाराम नारायण रावताळे,अजय सुरमल ठाकरे, सरपंच नुराबाई मोहन पवार आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district rashan shop waiting frod