नंदुरबार जिल्ह्यातील चोवीस हजारांवर शेतकऱ्यांचा डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी 

धनराज माळी
Monday, 12 October 2020

२४ हजार ७७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम वितरित करण्याचे काम तत्काळ करण्यात येत आहे. 

नंदुरबार  ः राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात २४ हजार ७७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, २४ दहजार ६७१ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात १८६ कोटी ४६ लाख वितरित झाले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्त योजनेची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात तत्काळ आधार प्रमाणीकरणास सुरवात केली होती. पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळेपर्यंत कर्जमुक्तीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. जिल्ह्यातील महसूल यंत्रणा आणि सहकार विभागाने परस्पर समन्वयाच्या माध्यमातून आधार प्रमाणीकारणाचे चांगले नियोजन केले. आधार प्रमाणीकरणातील अडचणी सोडविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. 
सहकार विभागातर्फे ग्रामीण भागात पाच पथके तयार करून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्यात आले. या पथकांनी दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहितीही पोहोचवली. काही शेतकऱ्यांच्या हंगामी स्थलांतरामुळे येणाऱ्या अडचणीतूनही या पथकांनी मार्ग काढत अधिकाधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेतले. 

नंदुरबार तालुक्यात नऊ हजार ४१८, नवापूर तीन हजार ३६४, तळोदा एक हजार ७४६, अक्कलकुवा दोन हजार १७९, शहादा सात हजार ११७ आणि अक्राणी ९४७ अशा एकूण २४ हजार ७७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम वितरित करण्याचे काम तत्काळ करण्यात येत आहे. 

तालुकानिहाय शेतकरी संख्या- वाटप रककम 
नंदुरबार- ९३७५-७१ कोटी ३० लाख 
नवापूर- ३३५८- २३ कोटी १ लाख 
तळोदा- १७२२- १५ कोटी ३६ लाख 
अक्कलकुवा- २१७१- १५ कोटी ८ लाख 
शहादा- ७१०४ - ५८ कोटी ८ लाख 
अक्राणी- ९४४ - ३ कोटी ६३ लाख 

एकूण २४ हजार ६७१ शेतकऱ्यांच्या १८६ कोटी ४६ लाख वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच लाभाची रक्कम 
जमा करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात केवळ ३९८ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिले असून, त्यासाठी मोहीम स्तरावर सहकार विभागाच्या पथकांतर्फे काम सुरू आहे. लवकरच सर्व पात्र लाभार्थी कर्जमुक्त होऊन नववीन कर्ज घेण्यास पात्र ठरतील. 
-अशोक चाळक, सहकार उपनिबंधक, नंदुरबार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district in twenty four thousand farmers in got loansreduced