शेतकऱ्यांवर यंदाही अस्मानी संकटाची टांगती तलवार...दुबार पेरणी करूनही पिके पाण्यात !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

नंदुरबार जिल्ह्यात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. येथे कोणतेही औद्योगीकरण नाही, उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे शेतीवरच येथील शेतकरी जीवन जगतात.

!नंदुरबार ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला होता. त्यामुळे मागील वर्षाचा खरीप हंगाम पूर्णतः निकामी गेला होता. उलट बियाणे-खतांसह भांडवलासाठी उचललेले पैसे निघू शकले नव्हते. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची आस होती. रब्बी हंगाम चांगला गेला. या वर्षी खरीप चांगला होईल, अशी आस शेतकऱ्यांना आहे. मात्र पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर पाऊस झाला तर वादळवाऱ्याने केळी-पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

खरीप पिकांची झालेली पेरणी वाया गेली. आता दुबार पेरणी काही शेतकऱ्यांनी केली. शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे पिकांवरही पाण्याचा लोट फिरला. त्यामुळे यंदाचे वर्षही शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाची तलवार मानेवर असल्यासारखेच चित्र आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. येथे कोणतेही औद्योगीकरण नाही, उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे शेतीवरच येथील शेतकरी जीवन जगतात. त्यामुळे शेती आणि पाऊस या दोन्ही गोष्टी जिल्हावासीयांसाठी जीवनावश्‍यक आहेत. गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्रात बदल झाल्याने शेतीही धोक्यात आली आहे. वेळेवर पाऊस न पडणे, पाऊस पडला तर ऐन पिके काढणीच् यावेळी बेमोसमी पावसाचे आगमन, त्यातून हातात आलेल्या पिकांचे होणारे नुकसान, या सर्व बाबींमुळे शेतकरी हताश झाला आहे. तरीही पर्याय नाही. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने मागील वर्षाचे दुःख विसरत दर वर्षी पुन्हा नव्या उमेदीने नवीन खरीप-रब्बी हंगामासाठी शेतकरी सज्ज होतात. 

शहादा-तळोदा तालुक्यात नुकसान 

पिकांच्या नुकसानीसह घरांचीही पडझड 
१६ जूनला झालेल्या पावसामुळे तळोदा-शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. घरांची पडझड, केळी, पपई जमीनदोस्त, खरिपाची पेरणी केलेल्या शेतात पावसाचे फिरलेले लोट, मुसळधार पावसामुळे शेतात तयार झालेले जलाशय, शेताचे बांध फुटून वाहून गेलेली पिकासह शेतातील माती, यामुळे मोठे नुकसान झाले होते. शहादा तालुक्यात पिकांसह घरांच्या पडझडीचे सर्वाधिक एक कोटीचे नुकसान झाले आहे. तर तळोदा तालुक्यात ७५ लाखांचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांचे व घरांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाईसाठी प्रशासनाकडे पावणेदोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. दोन्ही तालुक्यांतील महसूल विभागातर्फे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

दोन दिवसांपूर्वी पुन्हा नुकसान 
शहादा तालुक्यात गुरुवारी (ता. २) रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कहाटूळ, जयनगर, कवठळ, सोनवद, मोहिदा, लोंढरे परिसरात वादळासह मुसळधार पाऊस झाला. त्यात पपई, केळी पिकासह नव्याने पेरलेली खरीप पिके पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली. त्यामुळे एकीकडे पाऊस झाल्याच्या आनंदात सकाळी उठल्यावर शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान पाहून दुःखी होऊन घरी परतावे लागले. एकीकडे शहादा-तळोदा तालुक्यात पाऊस जोरदार होत असला तरी नुकसान करीत आहे. तर नंदुरबार, नवापूर तालुक्यात फारसा पाऊस झालेला नाही. शनिवारी (ता. ४) अर्धा तास पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Due to heavy rains farmers Crisis