लॉकडाऊनमुळे... ३७ हजार स्थलांतरित कामगारांची वापसी 

धनराज माळी
Thursday, 23 July 2020

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे नोंदणीकृत आस्थापनांमधील कामगारांची माहिती एकत्रित करण्यात आली. तर नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर शहरातील व पंचायत समिती स्तरावर ग्रामीण भागातील माहिती संकलित करण्यात आली. 

नंदुरबार : जिल्ह्यातून आंतरराज्यात स्थलांतर झालेले ३६ हजार ७९५ मजूर लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतले आहेत. ही माहिती सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाली आहे.नुकतेच जिल्ह्यात तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांच्यामार्फत स्थलांतरित मजुरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. 

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या संदर्भात केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आंतरराज्य स्थलांतरित कामगारांची माहिती सर्वेक्षणाद्वारे संकलित करण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार ३६ हजार ७९५ कामगार परराज्यातून जिल्ह्यात परतले आहेत.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बैठक घेऊन सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार तीन स्तरावर ही माहिती संकलित करण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे नोंदणीकृत 
आस्थापनांमधील कामगारांची माहिती एकत्रित करण्यात आली. तर नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर शहरातील व पंचायत समिती स्तरावर ग्रामीण भागातील माहिती संकलित करण्यात आली. सर्व माहितीचे एकत्रित संकलन जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर करण्यात आले. त्यानुसार परराज्यात गेलेल्या तथापि आता परत परतलेल्या कामगारांची संख्या ३६ हजार ७९५ तर रोजगारासाठी परराज्यातून महाराष्ट्रात आलेल्या व परराज्यात न जाता लॉकडाऊनच्या काळात  महाराष्ट्रातच राहिलेल्या कामगारांची संख्या ३७४ आहे. 

जिल्ह्यात आलेले कामगार तालुकानिहाय  
अक्कलकुवा - ३५९० 
अक्राणी - ५९७३ 
नंदुरबार - ८२५६ 
नवापूर- ३८२३ 
शहादा - ९९६४ 
तळोदा - ५१८९ 

लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय जिल्ह्यात राहिलेले कामगार असे 
अक्कलकुवा तालुक्यातील २९, नंदुरबार १३१, नवापूर १३८ आणि शहादा तालुक्यातील 
७६ परराज्यातील कामगार आहेत. सर्वेक्षणासाठी संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी, जि.प. शाळेतील शिक्षक आदींनी सहभाग घेतला. सर्वेक्षणात कामगाराचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती आदी विविध ३० मुद्यांची माहिती 
संकलित करण्यात आली. जिल्ह्यात अत्यंत वेगाने हे काम पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणातून प्राप्त माहिती असंघटित कामगार विकास आयुक्तांना पाठविण्यात आली आहे. 

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Due to lockdown return of thirty seven thousand migrant workers