कोरोनामुळे शाळाबाह्य मुलांच्या सर्व्हेला ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

कोरोनामुळे यावर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण होऊ शकलेले नाही. मात्र प्रत्येक गावातील शाळाबाह्य मुलांची यादी जिल्हा परिषद शिक्षकांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे शाळा सुरू होताच शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण अपडेट केले जाईल. 
- बी.आर. रोकडे.- शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार. 

नंदुरबार : कोरोना संसर्गामुळे यावर्षी सर्वच स्तरावरील नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे नियोजनानुसार दरवर्षी होणारे कामे यावर्षी वेळेत होऊ शकलेले नाही. अशीच गत दरवर्षी होणाऱ्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत झाली आहे. कोरोनामुळे यंदा हा सर्वे होऊ शकलेला नाही. 
शाळाबाह्य, स्थलांतरित मजूरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागातर्फे सर्व्हेक्षण केले जाते, ते यावर्षी अद्याप होऊ शकलेले नाही. शिक्षण हे जीवनातील अविभाज्य घटक झाला. शिक्षणाशिवाय विकास नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शासनही सामाजिक, आर्थिक विकासासाठी प्रत्येकाला हक्काचे व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी पुढे सरसावले आहे. त्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येकाला शिक्षण मिळालेच पाहिजे. त्यामुळे दरवर्षी वाड्य़ा, वस्त्यांमध्ये सर्व्हेक्षण केले जाते. त्या सर्व्हेक्षणातून शाळाबाह्य मुलांची नोंद घेऊन त्यांचा वयोगटानुसार त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. १ ते ६ वर्ष वयोगटातली बालकांचे सर्व्हेक्षण करून त्यांचा गटनिहाय अंगणवाडी किंवा पहिलीचा वर्गात दाखल केले जाते. त्यासोबतच शाळेत का दाखल झाले नव्हते, त्याची कारणेही शोधण्यात येतात. 

शाळास्तरावर माहिती उपलब्ध 
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे यावर्षी कोरोनामुळे सर्व्हेक्षण होऊ शकले नसले तरी दरवर्षी ग्रामीण भागात शिक्षक हा सर्व्हे राबवितात. त्यामुळे दरवर्षीच्या सर्व्हेक्षणावरून त्यांच्याकडे विद्यार्थ्यांची यादी तयार असते. त्यात फक्त नवीन विद्यार्थ्यांची माहिती नसते. ते केवळ दोन -चार विद्यार्थ्यांची भर पडते. त्यामुळे शाळा सुरू होईल त्यावेळी पुन्हा शिक्षक सर्व्हेक्षण करतीलच. 

स्थलांतरामुळे नुकसान 
स्थलांतर हा नंदुरबार जिल्ह्याला लागलेला मोठा डाग आहे. रोजगाराचे साधने नसल्याने येथील हजारो कुटुंबे रोजगारानिमित्त परराज्यात स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांचा सोबत त्यांची चिमुकले बालकेही घेऊन जातात. कारण त्यांना सांभाळायला गावात घरी कोणी नसते. पालक आपल्या मुलांनाही सोबत नेतात. त्यामुळे शासन प्रयत्न करीत असले तरी अनेक बालकांचे स्थलांतरामुळे शैक्षणिक नुकसान होतेच. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar education department sarvey stop corona