शहाद्यात बाहेरून येणाऱ्यांमुळे वाढली संसर्गाची भीती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

केंद्र व राज्य शासनाने स्थलांतरित नागरिकांना घरवापसी केल्यामुळे जिल्ह्यात परराज्यातून व बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक जिल्ह्यात दाखल झाले. आतापर्यंत तालुक्यात सुमारे सहा हजार ३६१ नागरिकांची घरवापसी झाली आहे.

शहादा (नंदुरबार) : शहरातील माणसे गावाकडे परतू लागल्याने तेथील ‘कोरोना’च्या संसर्गाने गावागावांमध्येही शिरकाव केला आहे. परिणामी गावेही बाधित होत असल्याने आता करावे तरी काय, असा प्रश्‍न ग्रामपंचायत प्रशासनासमोर ठाकला आहे. गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या नागरिकांनी काही दिवस स्वतःहून होम क्वारंटाइन व्हावे किंवा गाववेशीवरच राहण्याची सोय करून घ्यावी. जेणेकरून गावे सुरक्षित राहतील. आतापर्यंत शहादा तालुक्यात सुमारे सहा हजार ३६१ जणांचे आगमन झाले आहे. 

‘कोरोना’ विषाणूंचा संसर्ग सध्या सर्वत्र वाढत आहे. शहरात असलेला ‘कोरोना’ आता गावागावांमध्येही शिरला आहे. गावातही ‘कोरोना’ची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. मुळात ग्रामीण भागातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने शेत व आपले घर एवढाच जास्त संपर्क असतो. शहर वा बड्या सुखसोयींचा त्याला थांगपत्ताही नाही; परंतु सध्या सुट्या असल्याने परगावी नोकरी व कामधंद्यानिमित्त गेलेले नागरिक आपापल्या मूळ गावी परतू लागले आहेत; परंतु परतत असताना ते स्वतः सुशिक्षित असल्याने आपण संक्रमित नसलो, तरीही संक्रमित क्षेत्रातून आलेले असल्याने स्वतःहून निदान काही दिवस तरी इतरांशी व नातेवाइकांशी संपर्क टाळणे गरजेचे आहे; परंतु तसे न होता गाठीभेटी सुरू होतात आणि अगदी गावकुसाबाहेर न गेलेला माणूसही या आजाराला बळी पडू लागला आहे. 

विलगीकरण हाच उपाय 
दरम्यान, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस, महसूल विभाग, स्थानिक पातळीवरील प्रशासन, दक्षता समिती यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाने स्थलांतरित नागरिकांना घरवापसी केल्यामुळे जिल्ह्यात परराज्यातून व बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक जिल्ह्यात दाखल झाले. आतापर्यंत तालुक्यात सुमारे सहा हजार ३६१ नागरिकांची घरवापसी झाली आहे. 

तंतोतंत पालन व्हावे 
दरम्यान, ‘कोरोना’ विषाणूची लागण लवकर दिसून येत नाही. त्यामुळे ‘होम क्वारंटाइन’चे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे. मात्र, काही नागरिकांच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’ शिक्का असूनही ते बिनदिक्कतपणे वावरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दुसऱ्या बाजूला ‘होम क्वारंटाइन’ असलेले नागरिक बाहेर पडत नाहीत; परंतु त्यांच्या घरातील व त्यांच्या संपर्कातील नागरिक मात्र बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर पुणे- मुंबईसारखी परिस्थिती जिल्ह्यात होण्यास वेळ लागणार नाही. मुळात जिल्ह्यात बाहेरूनच या आजाराचे आगमन झाले आहे अन् अजूनही होत आहे. 

सांघिक प्रयत्नांची गरज 
प्रशासन आपले काम चोख करत असले, तरी त्यांना नागरिकांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. नागरिकांनीही आपल्यापुरता मर्यादित न ठेवता सांघिक प्रयत्न करून ‘कोरोना’ला हद्दपार करण्यासाठी एकवटले पाहिजे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Fear of infection increased due to outsiders in Shahada