नंदुरबारमध्ये आढळला "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

जिल्हा प्रशासनातर्फे त्याची "ट्रॅव्हल्स हिस्ट्री' तपासून पाहत असून, तो असलेल्या वॉर्ड 10 चा परिसर "सील' करण्यात आला आहे. तेथेही कोणत्याही हालचाली नसतील, असे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. 

नंदुरबार : जिल्ह्यात "कोरोना'चा "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आला आहे. "कोरोना'सदृश लक्षणे आढळून आल्याने या 44 वर्षीय संशयित रुग्णाला तीन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याचे "स्वॅब'चे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. दरम्यान, आज रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, यात तो "पॉझिटिव्ह' असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
हा रुग्ण नंदुरबार शहरातील असून, तो काही दिवसांपूर्वी मालेगावला जाऊन आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे त्याची "ट्रॅव्हल्स हिस्ट्री' तपासून पाहत असून, तो असलेल्या वॉर्ड 10 चा परिसर "सील' करण्यात आला आहे. तेथेही कोणत्याही हालचाली नसतील, असे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी हा संशयित नंदुरबार शहरातील वॉर्ड 10 मधील असून, आज रात्री बारापासून शहर तीन दिवस पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. हा रुग्ण असलेला परिसर तातडीने "सील' करण्यात आला असून, रुग्णावर अतिदक्षता विभागात "क्वारंटाइन कक्षा'त उपचार सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, उद्यापासून (ता. 18) भाजी बाजारासह किराणा व इतर सूट दिलेल्या सेवा (अत्यावश्‍यक सेवा वगळता) स्थगित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar first corona possitive case