esakal | पाच वर्षापासून रखडलेले काम कोरोनाने केले सुरू...नंदुरबारमध्‍ये होतोय हा चमत्‍कार
sakal

बोलून बातमी शोधा

covid hospital

एक कोटीपेक्षा अधिक खर्चाचे १०० बेडचे स्वतंत्र महिला रूग्णालयाचे काम २०१४ मध्ये काम अपूर्ण सोडून ठेकेदाराने पलायन केले होते. तेव्हापासून महिला रूग्णालयाचा बांधकामाचे भिजत घोंगडे पडले होते.

पाच वर्षापासून रखडलेले काम कोरोनाने केले सुरू...नंदुरबारमध्‍ये होतोय हा चमत्‍कार

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार  नंदुरबार शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील महिला जिल्हा रूग्णालयाला दीडशे बेडचे ऑक्सिजन रूग्णालय म्हणून तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यादृष्टीने कामाला वेग आला आहे. आदिवासी विश्वदिना निमित्त ९ ऑगष्टला रूग्णालयाचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे रूग्ण संख्या कितीही वाढली तरी साधारण साडे आठशे क्षमतेची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहे. तसेच ऑक्सिजन रूग्णालयामुळे ५० वर्षाआतील संसर्गित रूग्णांचा मृत्यूचा दर कमी होण्यास मदत होणार आहे. 

पाच वर्षापासून ठप्प झालेले काम सुरू 
एक कोटीपेक्षा अधिक खर्चाचे १०० बेडचे स्वतंत्र महिला रूग्णालयाचे काम २०१४ मध्ये काम अपूर्ण सोडून ठेकेदाराने पलायन केले होते. तेव्हापासून महिला रूग्णालयाचा बांधकामाचे भिजत घोंगडे पडले होते. मात्र कोविड -१९ परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी स्वतः त्याकडे लक्ष देऊन त्या कामाला सुरूवात केली. तेथे आता स्वतंत्र कोविड रूग्णालय तेही प्रत्येक बेडजवळ ऑक्सिजन व्यवस्था असलेले सुसज्ज रूग्णालयात साकारण्यात येत आहे.जिल्हा प्रशासनाने आत्तापर्यंत एकाचवेळेसे साडे आठशे रूग्णांना दाखल करून घेता येतील एवढे बेड व औषध साठ्याचे नियोजन पूर्ण केले आहे. 

खासगी डॉक्टरांची मदत घेणार 
कोविड-१९ साठी स्वतंत्र डॉक्टर व कर्मचारी भरतीसाठी दोन वेळेस जाहिराती काढण्यात आल्या. मात्र पाच डॉक्टर रूजू झाले. मात्र पाच दिवसातच ते सोडून गेले. कोरोनाची धास्ती डॉक्टरांनाही आहे. इतर कर्मचारी स्टॉफ आहे. मात्र डॉक्टरांची कमी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टरांची मदत मागितली आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनीही मदतीची तयारी दर्शविली आहे. 

खासगी कोविड सेंटर मंजूर 
अनेक जणांचा कोविड-१९ चे लक्षणे असली तरी ते भीतीने जिल्हा रूग्णालयात येत नाहीत. काहींचा मते पुरेशासुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे खासगी डॉक्टरांकडे जाण्याचा कल असतो. नंदुरबार जिल्ह्यात खासगी कोविड सेंटर नाहीत. त्यामुळे दोन रूग्णालय सुरू करण्यास खासगी डॉक्टरांनी समंती दर्शविली आहे. त्यानुसार शहादा बायपास रस्त्यावर तापी कोविड सेंटर कालपासून सुरू झाले आहे. तेथे काही रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. 

खासगी लॉजेस 
अनेकांना एकांत व टिव्हीसह विविध सुविधा अपेक्षित असतात. त्या जिल्हा प्रशासन पुरवू शकत नाही. अशा रूग्णांना त्यांचा इच्छेनुसार हॉटेलमध्ये क्वरंटाईन होता येईल. त्यासाठी गौरव पॅलेस नंतर आदर्श लॉज व श्रीनाथजी यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्हा रूग्णालयातील ताण कमी होण्यासही मदत होणार आहे. 

औषध साठा नोंदणी 
औषध साठा कमी पडू नये, म्हणून त्याचेही नियोजन करण्यात आलेआहे. ३० हजार रुपये किंमत असलेल्या टॉसिझ्यूमॅब १०० इंजेक्शनची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा शल्यचिकित्सक यांनी अनेक वितरकांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. 
सध्या टॉसिझ्यूमॅब १० इंजेक्शन पैकी ५, रेमडीसीव्हीर ४० इंजेक्शन पैकी ११ तर फेविपिरॅविर १७० इंजेक्शन्स पैकी ३० 
इंजेक्शनच्या वापर झाला आहे. ८९ लाखाची आर्टीफिशियल लॅबचे काम लवकरच सुरू होईल. एकाच वेळेस १२०० स्वॅब अहवाल मिळू शकतील. तसेच ६० लाखाचे स्वॅब तपासणी किटस् मागविण्यात आल्या आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे