नंदुरबार शहरातील ५६ मंडळांसह घरगुती बाप्पाला निरोप 

धनराज माळी
Wednesday, 2 September 2020

नंदुरबारचा गणेशोत्सवात खरे आकर्षण असते ते दादा व बाबा गणपतींच्या हरिहर भेटीचे. मात्र कोरोनामुळे ही भेट रद्द करण्यात आली होती.

 नंदुरबार ः दाटला जरी कंठ, तरी निरोप देतो तुला हर्षाने, माहित आहे मला देवा पुन्हा येणार तू वर्षाने या भावनेने बाप्पाला जयघोष करीत निरोप देण्यात आला. जगावर आलेल्या कोरोना संकटाचे निवारण करण्याचे साकडे घालत मानाचे दादा व बाबा गणपतीसह शहरातील ५६ सावर्जनिक गणेश मंडळांनी मंगळवारी (१ सप्टेंबर) लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. दरम्यान घरगुती गणपतींचे विसर्जन शिवण नदीवर तसेच पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. 

कोरोनाच्या संकटामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही साधारण तीनशेवर मंडळांनी गणेशोत्सवाची पंरपरा कायम ठेवली. शहरातील काही मंडळांनी पाचव्या, सहाव्या व सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. शासन-प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साद घालत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. त्यात नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. 

मानाच्या दादा-बाबा गणपतींचे विसर्जन 
नंदुरबारचा गणेशोत्सवात खरे आकर्षण असते ते दादा व बाबा गणपतींच्या हरिहर भेटीचे. मात्र कोरोनामुळे ही भेट रद्द करण्यात आली होती. ना गुलालाची उधळण, ना ढोल-ताशांचा गजर तरीही साध्या पद्धतीने मिरवणूक काढत गणरायांना निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालून जयघोष करण्यात आला. 

सोनी विहिरीत विसर्जन 
मानाचे दादा व बाबा गणपतींचे येथील मोठ्या मारुतीजवळ असलेल्या सोनी विहिरीत विसर्जन करण्यात आले. त्यासोबत काही घरगुती गणेशमूर्तीचे येथे विसर्जन करण्यात आले, तर काही मंडळांनी शिवन नदीत गणेशमूर्तीचे विसर्जन केले. अनेक कुटुंबांनी शिवण नदीवर जाऊन मनोभावे गणरायाला निरोप दिला. 

पालिकेतर्फे तीन कृत्रिम तलावांची निर्मिती 
पालिकेने घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी तीन कृत्रिम तलाव निर्माण केले होते. त्या तलावात घरगुती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले़, तर नागरिकांनी बाहेर पडून नये, गर्दी होऊ नये, म्हणून पालिकेने घरपोच मूर्ती संकलनाची व्यवस्था केली होती. 
जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मागर्दशर्नाखाली जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वतः श्री. पंडित व अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा हजर होता.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Ganpati immersion in Nandurbar city in peace