esakal | विद्यार्थिनी, महिलांना सॉफ्टवेअरचे मोफत प्रशिक्षण 
sakal

बोलून बातमी शोधा

software training

किमान पात्रता 
- वय : १७ ते २५ वर्षे 
- शैक्षणिक पात्रता : किमान दहावी उत्तीर्ण 
- आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित घटकांतील मुली-महिलांनाच संधी 

विद्यार्थिनी, महिलांना सॉफ्टवेअरचे मोफत प्रशिक्षण 

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यातील १०० विद्यार्थिनी, महिलांना सॉफ्टवेअरचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळेतील व वसतिगृहातील विद्यार्थिनींना प्राधान्य देत, नामांकित कंपनीत रोजगारासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुणे येथे होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय स्तरावर मंगळवारी (ता. २४) मूलभूत गणित या विषयाची चाचणी घेण्यात येणार आहे. 
गुरुग्राम (हरियाना) येथील नवगुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेल्फेअर या संस्थेमार्फत २०१६ पासून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील युवक-युवतींसाठी ‘डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग’ हा एक वर्षांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. 
 
यंदा मुली, महिलांना संधी 
आदिवासी मुली, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्थेने यंदा केवळ युवती, महिलांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत शंभर विद्यार्थिनी, महिलांची निवड झाली असून, उर्वरित शंभर जागांसाठी आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थिनींची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठीची निवडप्रक्रिया चार टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी मंगळवारी मूलभूत गणित या विषयाची चाचणी परीक्षा राज्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा स्तरावर घेण्यात येईल. त्यातून निवड झालेल्यांना कोंढवा (पुणे) येथे एक वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्था करणार आहे. 

किमान पात्रता 
- वय : १७ ते २५ वर्षे 
- शैक्षणिक पात्रता : किमान दहावी उत्तीर्ण 
- आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित घटकांतील मुली-महिलांनाच संधी 

प्रवेशप्रक्रिया 
पहिल्या टप्प्यात मूलभूत गणित या विषयाची दोन तासांची ऑफलाइन परीक्षा घेतली जाईल. त्यात उत्तीर्ण विद्यार्थिनींची मूलभूत इंग्रजीची चाचणी फोन कॉलवरून घेण्यात येईल. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची मूलभूत बीजगणित या विषयाची चाचणी फोन कॉलवरून घेण्यात येणार आहे. हे सर्व टप्पे पार करून निवड झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांसोबत चर्चा करून त्यांची संमती घेतली जाईल आणि नंतर त्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे