तरूणांनी साकारली गट शाळा; अतिदुर्गम भागातील मुलांना ज्ञानदान

दिनेश पवार
Friday, 25 September 2020

शिक्षित तरुणांनी गावांत गट शाळा सुरू केल्या असून कोणत्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता विद्यादान करत आहेत. या तरुणांना प्रोत्साहन देण्याकरिता अनेक सामाजिक संघटना, संस्था देखील पुढे येत आहेत.

मंदाणे (नंदुरबार) : कोरोना संसर्गाचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शाळा, महाविद्यालय बंद आहेत. शिक्षण विभागाने ऑनलाइनचा पर्याय अवलंबला आहे. पण डोंगरदरीतील गावांमध्ये मोबाईलची रेंज पोहचत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहत असल्याचे चित्र आहे. सातपुडा पर्वत रांगेतील धडगाव तालुक्‍यात गावातील शिक्षित तरुण अतिदुर्गम भागातील आपले बंधू-बघिणी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची भेट घेऊन गट शाळेच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर देत आहेत. 

शिक्षित तरुणांनी गावांत गट शाळा सुरू केल्या असून कोणत्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता विद्यादान करत आहेत. या तरुणांना प्रोत्साहन देण्याकरिता अनेक सामाजिक संघटना, संस्था देखील पुढे येत आहेत. उमराणी बुद्रुक येथील तरुण दिलीप पावरा, चेतन पावरा यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व अभ्यासात खंड पडू नये या उद्देशाने शिक्षण देणे सुरू केले. रोज सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत हे तरुण विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य करीत आहेत. एक पाडा झाल्यानंतर दुसऱ्या पाड्यात हे तरुण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जात आहेत. 

संस्‍थांनी घेतली दखल
तरुणांच्या कार्याची माहिती शारदाई फाउंडेशन व रोषमाळ गावातील हुडल फाउंडेशनला मिळाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या तरुणांची भेट घेतली. भेटी दरम्यान गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शैक्षणिक साहित्यांचे वाटप शारदाई फाउंडेशन व हूडल फाउंडेशनचे अध्यक्ष बापू पावरा यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. धडगाव सारख्या अतिदुर्गम भागात राहून शिक्षणाचे कौतुकास्पद कार्य करणाऱ्या तरुणांचा सन्मान देखील फाउंडेशनकडून करण्यात आला. 
 
तालुक्यातील जे युवक गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत, अशा युवकांना शारदाई फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करण्यात येईल, त्याबाबत आमच्याशी साधावा. 
-जगदीश पावरा, अध्यक्ष, शारदाई फाउंडेशन, उमराणी बुद्रुक, ता. धडगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar group school for young people and teaching