फडापर्यंत पोहचत मजुरांची विचारपूस; चेहऱ्यावर झडकले समाधान

फुंदीलाल माळी
Sunday, 29 November 2020

तळोदा तालुक्यातील धानोरा व खूषगव्हाण या गावांच्या शेत शिवारातील ऊस तोडणी मजुरांची माहिती मिळवणे व त्यांना आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविण्याचे काम सुरू आहे.

तळोदा (नंदुरबार) : शेत शिवारातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आशा कार्यकर्ते व सामुदायिक वैद्यकीय अधिकारी ऊस तोडणी सुरू असलेल्या शेतात व मजूर राहत असलेल्या फडापर्यंत जाऊन मजुरांची विचारपूस करीत आहेत. त्यामुळे आरोग्य व आशा कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे ऊसतोड मजुरांना हक्काचा आरोग्य रक्षकांची सेवा मिळत आहे. यामुळे ऊसतोड मजुरांनी समाधान व्यक्त केले.

तळोदा तालुक्यातील धानोरा व खूषगव्हाण या गावांच्या शेत शिवारातील ऊस तोडणी मजुरांची माहिती मिळवणे व त्यांना आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविण्याचे काम सुरू आहे. यासाठी आशा कार्यकर्ते मजुरांच्या मुक्काम असलेल्या फडात व ऊस तोडणी सुरू असणाऱ्या शेतात जाऊन माहिती घेत आहेत. धानोरा शिवारात ज्योती साळवे या आशा सेविका व संध्या साळवे या आशा गटप्रवर्तक ऊस तोडणी मजुरांची माहिती घेण्यासाठी शेतांमध्ये जाऊन माहिती घेत आहेत.

एकाच ठिकाणी अठरा कुटूंब
तेथे त्यांना तपासणीत 18 कुटुंबे ऊस तोडणीच्या ठिकाणी आढळली. तेथे एक स्तनदा माता व 3 गरोदर माता होत्या. त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. तेथेच 0 ते 5 वयोगटातील 19 मुले होती. त्यांचीही माहिती घेऊन त्यांच्या आरोग्यासाठी प्रबोधन करण्यात आले. तर दुसरीकडे सामुदायिक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वळवी व कर्मचाऱ्यांनी खूषगव्हाण येथे ऊसतोड मजुरांची भेट घेऊन आरोग्याच्या समस्यांसंदर्भात विचारपूस केली. तेथे दोन गरोदर माता होत्या. त्यांना औषधोपचाराबद्दल विचारणा करून जवळचा उपकेंद्रांमध्ये येऊन तपासणी करण्यासाठी त्यांना तयार करण्यात आले.

संपुर्ण तालुका पिंजणार
संपूर्ण तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन सुरू असून ऊस तोडणी कामगार राहत असलेल्या सर्वच ठिकाणी व शेत शिवारात जाऊन आरोग्य कर्मचारी आरोग्य तपासणी करणार आहेत. त्यात कोरोना व इतर आजारांबद्दल जनजागृती केली जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. ऊसतोडणी मजुरांची तपासणी आशा कार्यकर्ते व सामुदायीक आरोग्य अधिकारी त्यांचा ठिकाणापर्यंत पोहोचून करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar health department cheaking sugar worker