नंदुरबार जिल्हा : अतिवृष्टीने १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

धनराज माळी
Monday, 28 September 2020

सप्टेंबर महिन्यात झालेला सततचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ८२३४ शेतकऱ्यांच्या शेतात ४३६४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नंदुरबार : ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आॅगस्टमधील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी ७ कोटी ७५ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

ऑगस्ट महिन्यात पावसामुळे जिल्ह्यातील २६ हजार ४६१ शेतकऱ्यांकडील ११ हजार २४२ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील २८३ हेक्टर, नवापूर ३९१८ हेक्‍टर, अक्कलकुवा २५९९ हेक्‍टर, शहादा ११९० हेक्‍टर, तळोदा १२५ हेक्‍टर, आणि अक्राणी तालुक्यात ३१२५ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात जिरायती व फळपिके सोडून इतर बागायती पिकांचा समावेश आहे. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे. 

सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे 
सप्टेंबर महिन्यात झालेला सततचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ८२३४ शेतकऱ्यांच्या शेतात ४३६४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून लवकरच अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. 

सप्टेंबरचा अंतिम अहवाल बाकी 
प्राथमिक अहवालानुसार नंदुरबार तालुक्यात ११७० शेतकऱ्यांचे ९८५ हेक्टर, नवापूर ५१२३ शेतकऱ्यांचे १८२८ हेक्‍टर, अक्कलकुवा २१० शेतकऱ्यांचे ६० हेक्टर, शहादा ३५१ शेतकऱ्यांचे २६१ हेक्‍टर. आणि अक्राणी तालुक्यात १३८० शेतकऱ्यांच्या १२३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कापूस, ऊस, मका, सोयाबीन, मिरची, तूर, भात आणि ज्वारी पिकांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar heavy rain 15 thousand hector loss farmer