वैंदाणे ग्रामीण भागातही ऑनलाईन व्यवहाराकडे वाढ 

हिंमत बोरसे 
Tuesday, 2 June 2020

शेतकऱ्यांनी आपल्या शिकलेल्या मुलांच्या साह्याने आपला शेतमाल थेट ऑनलाईन नेला आणि व्हाट्सअप ग्रुप वर त्याची माहिती दिली ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आपला शेतमाल स्मार्ट फोन मुळे व ऑनलाईन मूळे विक्री करता आली.

वैंदाणे: एरवी ऑनलाईन व्यवहार हा शब्द जरी ऐकला तरी त्याचे दुष्परिणाम खुप होतात म्हणून त्यापासून लांब राहणारा ग्रामीण भाग आता ऑनलाईन व्यवहाराकडे आपला कल वाढला असून त्यात वाढ होत आहे. लॉक डाउन मुळे संचार बंदी, शिवाय शहरात जाणे म्हणजे अनेक कायद्याच्या चौकटी पार पाडून जावे लागत होते. सोबत शेतातील कामे ही जोरावर होती म्हणून या वेळी स्मार्ट फोन वरदान ठरला. 

बँकिंगसाठी आणि अभ्याससाठी उपयोग 

लॉक डाउनच्या काळात आपल्या बँक खात्यातील शिल्लक रकम तपासून पाहण्यासाठी शहरात जाणे गैरसोयीचे होते म्हणून आपल्या मोबाईल नंबर बँक लिंक करून आणि मिस कॉल देऊन तसेच ॲप डाऊनलोड करून माहिती मिळवत आहेत. ATM बाहेरील रांगेत उभे राहण्या पेक्षा मनी ट्रान्स्फर अँपचा उपयोग केला जात आहे. शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम अपूर्ण होता तो पूर्ण करण्यासाठी ही शाळांनी लर्निंग फ्रॉम होम हा उपक्रम राबवला. त्यासाठीही ऑनलाइन ही गरज भासली त्यामुळे कधी नव्हे तो ग्रामीण भाग ऑनलाइन चा वापर करत आहे. 

व्हिडीओ कॉल अँप सध्या कुणाचेच नातेवाईक एकमेकांच्या घरी जात नाहीत. अनेक दिवस झाले कोणी एकमेकांना पाहिलेले नाही त्यावरही उपाय म्हणून व्हिडीओ कॉलिंगचा वापर होत आहे. आजी आजोबा व्हिडिओचा वापर करत नातवंडांन सोबत गप्पा मारताना दिसत आहेत. 

शेतीमालाची विक्रीही पहिल्यांदाच ऑनलाईन

शेतात पिकलेला माल बाजार पेठेत घेऊन जाऊन विक्री होत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस बाजारपेठही बंद होत्या मग आपला माल विकायचा कसा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता परंतु शेतकऱ्यांनी आपल्या शिकलेल्या मुलांच्या साह्याने आपला शेतमाल थेट ऑनलाईन नेला आणि व्हाट्सअप ग्रुप वर त्याची माहिती दिली ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आपला शेतमाल स्मार्ट फोन मुळे व ऑनलाईन मूळे विक्री करता आली. त्यामुळे चांगला नफा ही मिळाला व व्यवसायाचं गुपितही सापडलं एकंदरीत सोशल मीडिया आणि ऑनलाइन पासून लांब राहणार ग्रामीण भाग आता कात टाकत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Increase in online transactions even in rural areas