पावसामुळे बेडकी- फागणे महामार्गाची लागली वाट; आमदार नाईक यांची गडकरींकडे चौकशीची मागणी  

विनायक सुर्यंवशी
Saturday, 29 August 2020

गुजरात हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत चालू आहे. महाराष्ट्र हद्दीत चौपदरीकरण उशिरा सुरू केले, खरे मात्र त्यातही सतरा विघ्न येत आहेत.

नवापूर : बेडकी ते फागणे या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी २९ कोटींपेक्षा जास्त खर्च झाले. पहिल्याच पावसात रस्‍त्‍याची वाट लागली असून लोकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. बेडकी ते फागणे या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती आणि त्यावर झालेला खर्च याची चौकशी व्हावी. रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा, जबाबदार ठेकेदार व संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार शिरिषकुमार नाईक यांनी केली आहे. 

बेडकी ते फागणे या राष्ट्रीय महामार्गाचे झालेली दुरवस्था पाहता शासनाने रस्ता दुरुस्तीसाठी वर्षभरात तीन वेळा निधी मंजूर केला. जवळपास २९ कोटींच्यावर आलेला निधी वाया गेला की काय अशीच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची चाळण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून रस्ता एक पावसाळ्यातही तग धरू शकत नसेल, तर कामाची गुणवत्तेबाबत शंका येणे साहजिकच आहे. 

सुरत- नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले मात्र काही अडचणीमुळे महाराष्ट्र हद्दीतील बेडकीपासून काम रेंगाळत राहिले. गेल्या दोन पावसाळ्यापासून काम बंद झाले. गुजरात हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत चालू आहे. महाराष्ट्र हद्दीत चौपदरीकरण उशिरा सुरू केले, खरे मात्र त्यातही सतरा विघ्न येत आहेत. गेल्या दोन वर्षापासून प्रवासी व वाहन चालक रस्तावरील खड्ड्यातून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. 

सहा महिन्यापूर्वीच दुरूस्‍ती 
लोकप्रतिनिधी व प्रशासनाने प्रयत्न करून जुन्याच मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी आणला, सहा महिन्यात दुरुस्ती झाली खरी, मात्र पहिल्याच पावसात रस्ता जैसे थे झाला. तसे पाहता २४ मार्चपासून देशात संचारबंदी असल्याने रस्त्यावर वाहतूक देखील बंद होती. नंतर शासनाने अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरू केली. म्हणून एवढे दिवस रस्ता टिकला. पावसाळ्यात पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली. रस्‍त्‍याची दुरुस्ती झाली आणि लगेच खड्डे पडले असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक देखील करत आहेत. 

रस्ता दुरुस्ती करणारा ठेकेदार आणि त्याच्यावर देखरेख ठेवणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यात दोषी व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. लोकांच्या जिवाशी होणारा खेळ सहन केला जाणार नाही. रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करावी, रस्ता वाहतुकीला सोईस्कर झाला पाहिजे, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तात्काळ सुरू झाले पाहिजे. 
-शिरीषकुमार नाईक, आमदार 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Inquiry into highway repairs during Bedki-Phagne MLAs demand from Minister Gadkari