हात न लावता सॅनिटायझर हातावर...आणि सलाईन संपताच वाजणार अलार्म ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

सध्याच्या कोरोना वायरसच्या व लॉकडाऊनच्या काळात क्लबच्या विद्यार्थ्यांनी फावल्या वेळात अभ्यासाव्यतिरिक्त क्लबमार्फत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा नाविन्यपूर्ण उपयोग केला आहे.

नंदुरबार : मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून मुलांना विज्ञाननिष्ठ बनविण्याचा प्रयत्न येथील आइनस्टाइन रोबो क्लबतर्फे सुरू आहे. अलिकडे प्रचलित शाखा रोबोटीक्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिकदृष्टया कार्यप्रवण करण्याचा प्रयत्न क्लबने रूजविल्याने विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती वापरत सध्याच्या कोरोनाच्या स्थितीत उपचारासाठी अनेक नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे. त्यांचे हे प्रयत्न दाद देण्यासारखे आहेत. हात न लावता सॅनिटायझर येईल हातावर अन सलाईन संपताच वाजणार अलार्म असे अफलातून प्रयोग या चिमुरड्यांनी लॉकडाऊनमध्ये केले आहे. 

पाश्चात्य देशांमध्ये खूप आधी म्हणजे १९५६ मध्ये पहिला रोबो बनविला गेला. त्यामानाने भारतात अलिकडे म्हणजे २०१४ मध्ये रोबो बनविण्यात आला. इतर देशांत लहानपणापासूनच मुलांना टेक्नॉलॉजीचा वापर करायला शिकविले जाते. याच गोष्टींचा विचार करून नंदुरबारमधील श्री आशापुरी माता फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर या संस्थेतर्फे आइनस्टाइन रोबो क्लब सुरू केला आहे. संस्थापक दिनेश पाटील यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकांसोबत या अभिनव उपक्रमाला चालना दिली. 

या संस्थेमार्फत केलेल्या एका सर्व्हेमध्ये दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप क्षमता असून त्या विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे लक्षात आले. सत्तर टक्के पालक मध्यमवर्गीय आहेत. अशा पाल्यांपर्यंत रोबो कोर्स पोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. वर्षभरापासून हा क्लब सुरू आहे. असंख्य विद्यार्थी या माध्यमातून रोबोटिक्स तंत्रज्ञानासी जोडले गेले आहेत. मुलांची ही वैज्ञानिक भूक या क्लबच्या माध्यमातून पूर्ण होवू शकते. 

आत्मविश्‍वासात होते वाढ 
(Robonist)रोबोनिस्ट असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसून येते. आर्द्रता, तापमान, वाऱ्याचा वेग मोजणे, मोजपात्र बनवून पर्जन्य मोजणे, अनेक शैक्षणिक (पाठ्यपुस्तकातील) प्रयोग स्वत: करून पडताळा घेणे,या क्लब मार्फत या विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ आणि वरिष्ठांच्या निगराणीत अनेक प्रयोग सफल केले आहेत. 

काठिण्य पातळीचा उपयोग 
क्लबमधे रोबोची निर्मिती करण्याआधी अनेक छोट्या व मोठ्या गोष्टींचे प्रशिक्षण देतांना 
वैयक्तिक लक्ष दिले जाते. विज्ञानाच्या विविध पैलूंची ओळख करून दिली जाते. विज्ञानाची काठीण्य पातळी टप्प्या-टप्प्याने वाढवत खालील विषयांमध्ये विद्यार्थ्यांना पारंगत केले जाते. त्यात विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल्स्, मॅकेनिकल, कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, फिजिक्स या सारख्या कठिण वाटणाऱ्या विषयांशी विद्यार्थ्यांची मैत्री होते. 

पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अनेक इलेक्ट्रॉनिक्स Componants ची ओळख करून दिली जाते. त्यानंतर प्रोजेक्ट व सिद्धांत समजवला जातो. विद्यार्थी हे सगळे स्वत: तयार करतात व बनवलेले प्रोजेक्ट विद्यार्थी घरी नेतात आणि शेवटी रोबोची जोडणी करतात. सहावी ते दहावीचे विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. 

सध्याच्या कोरोना वायरसच्या व लॉकडाऊनच्या काळात क्लबच्या विद्यार्थ्यांनी फावल्या वेळात अभ्यासाव्यतिरिक्त क्लबमार्फत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा नाविन्यपूर्ण उपयोग केला आहे. ऑनलाइन मार्गदर्शन घेऊन अनेक प्रोजेक्ट तयार करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. 
काही मुलांनी क्लबच्या (Engergy Generator)एनर्जी जनेरेटर या (Project)प्रोजेक्ट मधील फॅनचा उपयोग करून ॲटोमॅटिक टॉर्च सायकल,तर कोणी अॅटोमॅटिक टॉर्च हेल्मेट विकसित केले. कोणी Water Level Indicator (वॉटर लेव्हल इंडिकेटर) ला शेतात पाणी भरण्यासाठी वापरला. काहींनी नैसर्गिक सौर उर्जेचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा म्हणून सोलर ट्रेकींचा प्रयत्न केला तर काहींनी आता सुरू असणाऱ्या ऑनलाइन क्लासेससाठी मोबाईल स्क्रिन मोठी व्हावी म्हणून फ्रेजल लेन्स वापरण्याचा प्रयत्न केला. तर एकाने दरवाजाला IR,PIR Sensor लावून चोरांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. 

असे प्रयत्न असे संशोधन 
सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांनी तत्कालीन समस्या कोरोनावर विचार करून आमच्या प्रोजेक्टमधील (Object Detector)ऑब्जेक्ट डिटेक्टर वापरून हॅन्ड सॅनिटायझरला हात न लावता हात पुढे केल्यावर सॅनिटायझर हातावर येईल, सोशल डिर्स्टसिंगचा विचार करून दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर नसल्यास बझर वाजेल, सलाईन संपली की अलार्म वाजेल, इंजिनिअरींगच्या दोघा विद्यार्थ्यांनी पेशंटला रोबोव्दारे औषधी-गोळ्या देता येतील असा प्रयत्न केला. काही मुले अॅड्रीनोवर टेम्प्रेचर सेन्सर बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar The invention of the students of the Einstein Robot Club