जि.प.चे ठरले...एका बाकावर एकच विद्यार्थी

nandurbar zp.
nandurbar zp.

नंदुरबार- तळोदा : जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवीच्या शाळा येत्या १५ जूनपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी जिल्हा परिषदेन गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रत्येक तालुक्यातील आवश्‍यक माहिती मागविली आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या पंधरा दिवसात कोरोनाचा एकही रूग्ण नसलेली गावे कोणती आहेत ती आणि शाळा सुरू करण्याबाबत ग्रामस्थ आणि ग्रामशिक्षण समिती सदस्यांची मते काय आहेत याचा अहवाल येत्या दहा जूनपर्यत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी मागविला आहे. यात नंदुरबार आणि शहादा पालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांनाही पालिका शाळांबाबत सूचित करण्यात आले आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक सत्र् सुरू करण्याबाबत एकदम निर्णय घेता येणे अशक्य आहे, त्यामुळे जिल्ह्यातील स्थिती, कोरोनाच्या नियमावली पाळून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.त्यात सुरवातील फक्त सहावी ते आठवीच्या वर्गांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यातही फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आव्हान असणार आहे.त्यासाठी एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवित तीन तासांचे सत्र करीत दोन सत्रांमध्ये शाळा भरवावी किंवा पटसंख्येनुसार आज आलेल्या विद्यार्थ्यांना उद्या सुटी या तत्वावर आलटून पालटून विद्यार्थ्यांना बोलवावे असे नियोजन करण्याचे सुरू आहे. 
जिल्ह्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या ग्रामीण दुर्गम भागातील शाळांची माहिती गोळा करण्याचे कार्य सुरू झाले आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी गुगल लिंकद्वारे माहिती मागवली जात आहे. जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून मिळालेल्या निर्देशानुसार १५ जूनपासून कंटेनमेंट एरिया रेडझोन व्यतिरिक्त दुर्गम, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग असलेल्या शाळांसाठी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभ करण्याचे नियोजन होत आहे. 

शाळांतील सुविधांची माहिती 
शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या तसेच ग्रामपंचायतच्या कोरोना प्रतिबंधक समितीच्या बैठका घेऊन शाळा केव्हा सुरू कराव्यात याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्याची माहिती संकलन करण्यात येत आहे. त्यात विद्यार्थी पटसंख्या , वर्गखोल्यांची संख्या, उपलब्ध शिक्षक, स्थानिक राहणारे शिक्षक ,बाहेरून ये-जा करणारे शिक्षक किती? डिजिटल सुविधा टीव्ही, एलसीडी प्रोजेक्टर ,इंटरनेट सुविधा आहे का? डिजिटल सुविधा हाताळण्यासाठी असणारे मनुष्यबळ, शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे मत, शाळा प्रत्यक्ष सुरू जर होत नसेल तर ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी सुविधा या प्रकारची माहिती मागविण्यात आली आहे. 

काही मार्गदर्शक सूचना 
शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यात शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत कोरोना प्रतिबंधक समितीची बैठक घेऊन शाळा शुभारंभ करण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे. शाळा इमारत व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावे. मैदान मुख्याध्यापक दालन, सर्व वर्गखोल्या, स्वच्छतागृह, स्वयंपाक गृह यांची स्वच्छता करून घेण्यात यावी. पिण्यासाठी पुरेसे व स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध होईल याबाबत दक्षता घेणे. शिक्षक व विद्यार्थ्यांचे हात धुण्यासाठी हँडवॉश किंवा साबण तसेच सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनर उपलब्ध करून घेणे. ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांची मदत घ्यावी. विद्यार्थ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी. 

एका बाकावर एकच विद्यार्थी 
शाळेत डिजिटल वर्ग उपलब्ध असल्यास त्याची व्यवस्थित जोडणी करून वर्ग वापरणे योग्य करून घ्यावे. शाळेची पटसंख्या विचारात घेऊन विद्यार्थ्यांमधील योग्य शारीरिक अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यकता असल्यास शाळा दोन किंवा तीन सत्रांमध्ये जास्तीत जास्त तीन तासांची असावी किंवा तसे शक्य होत नसल्यास विद्यार्थ्यांना एक दिवस सोडून अदलाबदलीने शाळेत बोलवावे. एका वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे बसण्याची व्यवस्था करण्यात यावी. 
 
शिक्षक- विद्यार्थ्यांकडे मास्क हवाच 
शाळेमध्ये कोरोनाबाबत शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन संबंधित मुख्याध्यापक व अधिनस्त शिक्षकांनी करावे. सर्व शिक्षकांनी संपूर्ण शाळेच्या वेळेमध्ये मास्कचा वापर करावा तसेच विद्यार्थ्यांना देखील मास्कचा वापर करण्यास बाध्य करावे या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व माहिती संकलित झाल्यानंतर शाळा सुरू करणेबाबत काय निर्णय होतो याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com