कोवडी-१९ पथक कर्मचारी भरतीचा मुहूर्त गवसला...कुठे वाचा सविस्तर ! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

कोरोना संसर्गाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र त्यांचावर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी आहेत तेवढेच आहेत. त्यातच काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने सोडले नाही.

नंदुरबार ः जिल्हा रूग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतांना व त्याच डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाने पछाडले असतांना ते क्वारंटाईन झाल्यावर आरोग्य यंत्रणेची धावपळ होऊ लागली. तरीही शासनाने कोरोना विभागासाठी स्वतंत्र कोविड -१९ पथकासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले होते. तरीही आहेत त्याच कर्मचाऱ्यांवर कोविड कक्षाचे काम सुरू होते. याबाबीकडे सकाळ ने दोन दिवस बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अखेर प्रशासनाला कोविड पथक भरतीचे मुहूर्त गवसले आहे. भरती प्रक्रिया सुरू केली असून त्याला वेग आला आहे. 

नंदुरबार जिल्हा म्हटलं म्हणजे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी येण्यास नाखूष असतात, हे तेवढेच सत्य आहे. त्यामुळे कदाचित नंदुरबार जिल्हा रूग्णालय असो की जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. तरीही जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा योग्य त्या सेवा पुरवीत जिल्ह्यातील जनतेची सेवा करीत आहे. असे असतांना कोरोना महामारीने थैमान घातले, नंदुरबार जिल्हा सुरूवातीस कोरोनापासून लांबचा राहिला. मात्र दीड महिन्यानंतर नंदुरबारमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आत्तापर्यंत कोरोनाने उग्ररूपधारण केले आहे. या परिस्थितीत कोरोना संसर्गाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र त्यांचावर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी आहेत तेवढेच आहेत. त्यातच काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने सोडले नाही. त्यांनाही संसर्ग झाला. त्यामुळे ते स्वतः उपचार घेत असतांना रूग्णांवर उपचार करणार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला. जे डॉक्टर व कर्मचारी सेफ राहिले, त्यांचावरच सारा भार आला. त्यामुळे त्यांचीही ओढाताण होऊ लागली.

कोविड पथक कर्मचारी भरण्याचे निर्देश आरोग्य संचालकांनी दिले होते. जिल्हा रुग्णालयाकडून तशी प्रक्रिया पूर्ण होऊन वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आली होती. मात्र महिना उलटला, इकडे रूग्ण संख्या वाढत आहेत, आरोग्य यंत्रणा कर्मचारी कमी पडत असतांना भरतीची फाईलच दुर्लक्षित केली गेली होती.याबाबत सकाळ ने लक्ष वेधले. २७ जूनला कोरोना साठी कर्मचारी भरतीची फाईल आडली कुठे, या मथळ्याखाली व दुसऱ्या दिवशी २८ जूनला , भरतीसाठी संसर्ग वाढण्याची प्रतीक्षा ,या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत अखेर जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन भरती प्रक्रियेस वेग दिला आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सकाळ चे आभार व्यक्त केले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Kovadi-19 Squad found the moment of recruitment.