शंभर कोटींचा खर्च होऊनही कुपोषण कायमच! 

दीपक कुलकर्णी
सोमवार, 9 जुलै 2018

नंदुरबार : कुपोषण, बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे शंभर कोटी रुपये खर्च झाले. या विषयाला तात्पुरती "मलमपट्टी' केली जाते. मात्रस मुळापासून उपाय केला जात नाही. यावर्षी जिल्ह्यात 116 बालमृत्यू झाले आहेत, तर साडेतीन हजारांवर बालके अतिजोखमीची कुपोषित आहेत. 

नंदुरबार : कुपोषण, बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे शंभर कोटी रुपये खर्च झाले. या विषयाला तात्पुरती "मलमपट्टी' केली जाते. मात्रस मुळापासून उपाय केला जात नाही. यावर्षी जिल्ह्यात 116 बालमृत्यू झाले आहेत, तर साडेतीन हजारांवर बालके अतिजोखमीची कुपोषित आहेत. 
नंदुरबारसह राज्यातील आदिवासीबहुल लोकसंख्येची जिल्हे अर्भकमृत्यू व बालमृत्यूसाठी सतत चर्चेत असतात. धुळे जिल्हा असताना 1982 मध्ये बामणी (ता. धडगाव) येथे बालमृत्यू झाले. तेव्हापासून या भागात कुपोषण निर्मूलनासाठी शासनाने काम सुरू केले. त्यात बालमृत्यूची संख्या वाढली, की शासनाच्या योजनांचा रतीब सुरू होतो. नंतर ते सारे नियमिततेचा एक भाग होत आहेत. या सुमारे चार दशकांच्या काळात जिल्ह्यात कुपोषणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. 20 वर्षांत कुपोषण निर्मूलनावर एक अब्जहून अधिक निधी खर्च झाला आहे. 
 
कुपोषण- बालमृत्यू टाळण्यासाठीच्या योजना 
उपकेंद्र स्तरावर घरभेटीतून तपासणी, भरारी पथकाद्वारे घरभेटीतून तपासणी, प्रसूतीसाठी माहेरघर, आरोग्य सहायकांकडून पाहणी. आशा, आरोग्यसेविकांच्या घरभेटी, अतिजोखमीच्या बाळांची नोंदणी, "मानव विकास' कार्यक्रमांतर्गत तपासणी, समुपदेशन, बालोपचार केंद्र, ग्रामबालक विकास केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र. बुडीत मजुरी योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, कुपोषणमुक्ती कक्ष, पोषण आहार योजना आदी. 

ग्रामविकास केंद्र 
जिल्ह्यात कुपोषित बालकांसाठी 843 ग्रामबालविकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, सद्यःस्थितीत केवळ धडगाव तालुक्‍यात 143 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

कारण दुर्लक्षित 
बाळांना जन्म देणाऱ्या माताच कुपोषित असतील, तर बाळ कसे पोषित जन्माला येणार, असा प्रश्‍न कायम उभा राहतो. जननी सुरक्षा, आईची काळजी, गरोदर- स्तनदामातांची तपासणी असे उपक्रम राबवले जातात. मात्र, मुळात या मातांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळणे, त्यातून पोषणाबाबतची काळजी, तळमळ याबाबतची भावना जागृत होणे आवश्‍यक आहे; अन्यथा कितीही योजना आल्या, तरी बालकांचे कुपोषण कायम राहील. योजना राबवणाऱ्यांचे भरण-पोषण होईल, हे वास्तव नाकारता येणार नाही. 

कुपोषणावर झालेला खर्च 
जिल्हानिर्मितीपासून 20 वर्षांच्या खर्चाचा विचार केला, तर प्रारंभीच्या काळात अडीच कोटी रुपये प्रतिवर्ष खर्च झाला असावा. त्याअनुषंगाने वाढता खर्च लक्षात घेता, दरवर्षी सरासरी पाच कोटी रुपये सर्व योजना, मनुष्यबळावर खर्च झाला आहे. त्यानुसार 20 वर्षांत 100 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. 

जिल्ह्यातील बालमृत्यू 
वर्ष - संख्या 
2014 - 1024 
2015 - 1243 
2016 - 788 
2017 - 917 
2018 - 116 
(स्त्रोत : आरोग्य विभाग अहवाल) 

जिल्ह्यातील बालकांची स्थिती 
शून्य ते सहा महिने - 10,687 
सात महिने ते सहा वर्षे - 1,19,463 
एकूण बालके - 1,51,893 
कुपोषित कमी जोखीम - 14,673 
कुपोषित अतिजोखीम - 3,687 

 

Web Title: marathi news nandurbar kuposhan 100 carrore