रात्रीचा थरार..घरावर पेटते गोणपाट फेकून जाळण्याचा प्रयत्‍न; रिक्षाचा कोळसा

धनराज माळी
Thursday, 29 October 2020

दहा दिवसांपूर्वी एका घरावर दगडफेक केली होती व दारू पिऊन धिंगाणा घातला होता. याप्रकरणी रहिवाशांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात कारवाईबाबत निवेदन सादर केले होते. 

नंदुरबार : शहरानजीक असलेल्या पातोंडा जवळील मातोश्री कॉलनीत अज्ञात इसमांकडून रात्रीच्या सुमारास घरावर जाळलेले गोणपाट  फेकून घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात रिक्षा जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेत सुदैवाने जीवित हानी टळली आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
पातोंडा परिसरात अज्ञांतांनी २७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सचिन मिश्रा यांच्या मालकीची रिक्षा जाळण्यात आली. रात्री मिश्रा हे परिवारासह झोपलेले असताना गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी त्यांच्या घरावर जाळलेले गोणपाट फेकले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्यांचे रोजगाराचे एकमात्र साधन असलेली रिक्षा जाळण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना अश्रु अनावर झाले होते. 

दहा दिवसांपुर्वीही दगडफेक
मातोश्री कॉलनीमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. तसेच मागील १० दिवसांपूर्वी मोहनसिंग गिरासे यांच्या घरावर देखील घरावर दगडफेक झाल्याने त्यांचेही नुकसान झाले होते. या घटनेबाबत रहिवाशांनी एकत्र येत पोलिसांना निवेदन दिले आहे. याचे वाईट वाटून संशयितांनी येथील रहिवासी रोहिदास पटेल, रवींद्र शिंदे यांनाही फोनवरून धमकी दिली आहे. तेवढ्यावरच न थांबता सचिन मिश्रा यांच्या घरावर जाळलेले गोणपाट फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला. परंतू घरासमोर उभी असलेली रिक्षावर ते पडल्याने यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

गुन्हा दाखल
याबाबत सचिन मिश्रा यांच्या फिर्यादीवरून पूजा नामक महिला व तिचा साथीदार कालू मन्सुरी पूर्ण नाव माहीत नाही. या दोघांविरुद्ध संशयित म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे करीत आहेत. या घटनेबाबत पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी करून संशयितांवर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी रहिवाशांना सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar late night burns on the house but auto fire