लॉकडाउन अन्‌ दुकानांचे तोडले ‘लॉक’...चोरट्यांनी या वस्‍तू लांबवून आठ दिवसांची केली सोय

robbery
robbery

नंदुरबार : शहरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला चोरट्यांनी चांगलीच सलामी दिली आहे. मंगळ बाजारातील दोन किराणा दुकाने व एक कटलरी दुकान फोडली असून, इतर दुकाने फोडण्याच्या प्रयत्न झाला आहे. एकाच वेळी झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहरातील मंगळ बाजार परिसरात मध्यभागी ओटेधारक भाजीपाला मार्केटमध्ये अनेक दुकाने आहेत. त्यात किराणा दुकान, कटलरी दुकान, फ्रुटची दुकाने आहेत. जुनी सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी प्रकाश कन्हैयालाल गुरुबक्षानी यांचे प्रकाश किराणा दुकानाचे शटरला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश करीत तेलाचे डबे, साखरेचं अर्धा पोत व रोख रक्कम लंपास केले. चोरटे एवढ्यावरच न थांबता शेजारी असलेल्या महेंद्र प्रकाश चौधरी यांच्या किराणा दुकानातून एवरेस्ट मसाल्याची पाकिटे, खोबरेल तेल व इतर साहित्य लंपास केले. त्याचप्रमाणे चोरट्यांनी पुढे मार्गक्रमण करीत कलीम शेख कलीम पटवे यांची कटलरी दुकान फोडली. त्यातून ग्रीन पावडर, नेकलेस,नेकलेस मंगळसूत्र व इतर कटलरी साहित्य लंपास केले. तेवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी त्या परिसरातील मोहम्मद बोहरी यांची जडीबुटीची दुकान, गंगाबाई तांबोळी यांची पान दुकान व इतर दोन ते तीन दुकानांचे शटर उचकाऊन फोडण्याच्या प्रयत्न अयशस्वी झाला. 


लॉकडाऊनची संधी; दुकानांवर डल्ला 
लॉकडाऊनच्या आदेशानंतर मंगळ बाजारात खरेदी करण्यासाठी बुधवारी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. चोरी झालेल्या दुकानांमध्ये दिवसभर व्यवहार सुरू होते. सायंकाळी सातनंतर सर्व दुकानदार दुकाने बंद करून घरी निघून गेले होते. आज गुरुवार मध्यरात्रीपासून आठ दिवसांसाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची चोरट्यांनी चांगलीच संधी साधत दुकानांवर डल्ला मारला. आधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झालेला असताना चोरीची घडलेली घटना विक्रेत्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. 

'मोती' ने दाखवला माग 
दुकाने फोडण्याच्या घटनेनंतर विक्रेत्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क केला असता, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या पाठोपाठ ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी चोरी झालेल्या दुकानातील ठसे तपासणीसाठी घेतले आहेत. श्वान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुजीत डांगरे,हवालदार राजेश ठाकरे,पोलीस नाईक भीमसिंग नाईक,गोकूळ गावीत, संदीप खंदारे यांनी मोती नावाचा श्वानाला हुंगविले.मोतीने भाजीपाला मार्केटच्या बाहेरील प्रवेश द्वार ते मंगळ बाजारातील प्रार्थनास्थळ मार्ग येथून शहजादा नाला समोरील गल्ली पर्यंत माग दाखविला आहे.


संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com