बारावीच्या तपासलेल्या बहुसंख्य उत्तरपत्रिका शिक्षकांकडेच!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

लॉकडाऊनची मुदत वाढविल्याने दहावी बारावीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. अद्याप तपासलेल्या बहुसंख्य उत्तरपत्रिका व गुणपत्रिका शिक्षकांकडेच आहेत. दहावी इतिहासाच्या उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोहचल्या नसून काही ठिकाणी स्थानिक कस्टडीत तर काही ठिकाणी पोस्ट आफिसमध्ये अडकून पडल्या आहेत.

शहादा (नंदुरबार)  : लॉकडाऊनची मुदत वाढविल्याने दहावी बारावीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. अद्याप तपासलेल्या बहुसंख्य उत्तरपत्रिका व गुणपत्रिका शिक्षकांकडेच आहेत. दहावी इतिहासाच्या उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोहचल्या नसून काही ठिकाणी स्थानिक कस्टडीत तर काही ठिकाणी पोस्ट आफिसमध्ये अडकून पडल्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांची तपासणी होऊन विभागीय मंडळात जमा होणारा विलंब लक्षात घेता निकाल कधी लागतील याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. 

यंदा राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी दहावी तर १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणी कामात लॉकडाऊनमुळे अडथळे आले आहेत. यंदा खास बाब म्हणून उत्तरपत्रिका घरी नेऊन तपासण्यासाठी परवानगी देण्यात आली. ज्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत त्या नियामकांकडे पोहोचवणे, त्यांनी त्या उत्तरपत्रिका मुख्य नियामकांकडे देणे ही बारावीची काही अंशी तर दहावीची प्रक्रिया लॉकडाऊनमुळे थांबली आहे. उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या तपासून पुन्हा विभागीय मंडळाकडे देण्याचे आव्हान आहे. 

दहावीच्या इतिहासाच्या उत्तरपत्रिकांचे काही गठ्ठे शिक्षण विभागाच्या तालुका कस्टडीत तर काही गठ्ठे पोस्ट आफिसमध्ये लॉकडाऊन संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या विषयाच्या नियामकांची सभाही झालेली नाही. एकूणच बारावी व दहावीच्या उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियमण होऊन गुणपत्रिका विभागीय मंडळ कार्यालयात कधी जमा होतील याचे भाष्य कठीण आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar The majority of XII exam papers are available only to teachers!