esakal | लाखोंची उलाढाल आली हजारांवर 
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar market commity

खरा तर आत्तापर्यंत नवीन धान्याची प्रचंड आवक सुरू होते. मात्र पावसाने शेतकऱ्यांचे धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी काळी पडली आहे. सततच्‍या पावसामुळे पिके शेतातच उभी आहे. धान्य काढण्यासही सवड मिळत नसल्याने आवक मंदावली आहे. जुने धान्य काही प्रमाणात येत आहे. 
- किशोरभाई वाणी, अध्यक्ष , व्यापारी महाजन असोसिएशन, नंदुरबार 

लाखोंची उलाढाल आली हजारांवर 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार  शेती उत्पादन काढणीचा हंगामात दररोज पंधरा हजार क्विंटल विविध धान्य मालाची आवक होऊन लाखोंची उलाढाल होत असलेल्या महाराष्ट्रातील नामांकित बाजार समित्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आता धान्याची आवक किरकोळ स्वरूपाची होत आहे. त्यातही जुन्याच धान्याचा समावेश आहे. खरीप हंगामातील उत्पादन काढणीचा हंगाम सुरू झाला असला, तरी संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना पिके काढणीस पाऊस सवड देत नसल्याने नवीन धान्याचा हंगाम लांबला आहे. त्यातच पावसामुळे धान्य काळे पडू लागले आहे. तरीही आज आलेल्या काळी ज्वारीला बाजार समितीत साडेसातशे ते बाराशे रुपये दर मिळाला. 
शेतकऱ्यांचा धान्याला योग्य मोल व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना रोखीने पैसे देऊन व्यवहारात असलेल्या पारदर्शकतेमुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यांमध्ये लौकिक आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातूनच नव्हे, तर इतर जिल्हा व लगतच्या गुजरात, मध्येप्रदेशमधूनही शेतकरी येथे धान्य विक्रीसाठी येतात. त्यामुळे येथे दररोज विविध प्रकारच्या १५ हजार क्विंटल धान्याची आवक हंगामात झाल्‍याचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे दररोजची लाखोची आर्थिक उलाढाल होते. 

शेकडो हातांना काम 
बाजार समितीतील आवक मोठी असल्याने साहजिकच येथील उलाढाल मोठी आहे. त्यामुळे अडत्यांकडे मुनीम म्हणून शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तसेच शेकडो हमाल येथे आपले जीवन जगताहेत. त्यासोबतच वाहतुकीसाठी लागणारे वाहनधारक, चालक, मुकादम, धान्य निवडण्यासाठी लागणारे पुरुष व महिला मजुरांचा हातांना काम मिळाले आहे. त्यामुळे येथील बाजार समिती बाराही महिने गजबजलेली असते. 

हंगाम सुरू, आवक नाही 
खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, मठ, चवळी यासह विविध प्रकराच्या धान्य पिकांची काढणी पोळ्यानंतर सुरू होते. त्यामुळे बाजार समितीत या हंगामात व्यापारी, अडत्यांसह कामगारांनाही जेवणाची सवड मिळत नाही. एवढी धावपळ असते. मात्र मागील वर्षी खरीप हंगाम पावसाने सडविला. रब्बी हंगाम चांगला झाला. त्यामुळे रब्बीतील धान्याची आवक आत्तापर्यंत बाजार समितीत सुरू होती. मात्र ती किरकोळ स्वरूपाची असते. यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली, तर काही शेतकऱ्यांची पिके जोरदार होती. मात्र ती काढणीला असताना संततधार पाऊस सुरू आहे. पाऊस बंद होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र बंद होत नसल्याने पिके काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाजार समितीत आवक होऊ शकलेली नाही. सध्या नवीन धान्याची किरकोळ व जुन्या धान्याची असे मिळून तीनशे ते चारशे क्विंटल आवक होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे