जीवनावश्‍यक वस्तू खरेदीचा नावाखाली बाजारपेठेत गर्दी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

नंदुरबारकर काही ऐकण्याचा मनःस्थितीत दिसत नाहीत. पोलिसांकडून संचारबंदीचे पालन करण्यासाठी काटेकोर प्रयत्न केले जात आहेत. मात्र नागरिक त्यांना सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे.

नंदुरबार : संचारबंदी लागू केली असली तरी जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी दिलेली मुभा ही पोलीस व प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे .भाजीपाला, किराणा दुकानांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे . शासनाने ज्या उद्देशाने संचारबंदी लागू केली ,तो उद्देशच बाजूला पडला असून संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवीत बाजारपेठेत शेकडो लोकांनी एकाच ठिकाणी येऊन गर्दी करू लागले आहे .

शासनाने कोरोनाची साखळी तुटावी म्हणून एकमेकांना संपर्क होऊ नये, गर्दीचा ठिकाणी संसर्गाचा धोका असतो, म्हणून बाजारपेठेतील व्यवहार बंद करून नागरिकांनी घराबाहेर येऊ नये, म्हणून कलम १४४ व नंतर संचारबंदी घोषित केली. संचारबंदी काळात शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले पाहिजे. रस्तायवर केवळ पोलिसांचेच अधिराज्य पाहिजे. मात्र तसे चित्र नंदुरबार शहरात दिसून येत आहे. प्रशासन व पोलिस नागरिकांना आवाहन व विनंत्या करून मेटाकुटीश आले आहेत. मात्र नंदुरबारकर काही ऐकण्याचा मनःस्थितीत दिसत नाहीत. पोलिसांकडून संचारबंदीचे पालन करण्यासाठी काटेकोर प्रयत्न केले जात आहेत. मात्र नागरिक त्यांना सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंचा बाहू

पोलिसांकडून अटकाव केला जात असला तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली पोलिसांना नाइलाजास्तव नागरिकांना सोडावे लागत आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारीही ही वैतागले आहेत. त्यामुळे पूर्णतः दवाखाने व औषध विक्रेत्यांच्या दुकाने वगळता किराणा, भाजीपाला विक्रीही बंद करावी ,तरच एकाच ठिकाणी होणारी गर्दी टळू शकेल, अन्यथा संचार बंदीचा कोणताही लाभ नाही .

भाजीपाला, किराणा बंद करणे आवश्‍यक
शहरातील प्रत्येक कॉलनी व वस्त्यांमध्ये आता किराणापासून तर आरोग्य सेवा व भाजीपाला सहज मिळतो. नागरिकांना आपापल्या परिसरातील किराणा दुकानावरून वस्तू खरेदी करण्याची मुभा देऊन तसेच भाजीपाला विक्रेत्यांनाही वसाहतींमध्ये फेरी मारण्याची मुभा दिली पाहिजे. बाजारपेठेतील तसेच शहरातील मुख्य ठिकाणी असलेले किराणा दुकान, भाजीपाला विक्रीचे दुकाने बंद करण्याची सक्ती करणे आवश्यक आहे.किराणा दुकानांवर एकाच वेळेस २५-५० जण गर्दी करतांना दिसत आहेत. तर भाजीपाला बाजारात शेकडो जणांची गर्दी होते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी केला जाणारा खटाटोप अपयशी ठरत आहे.

दिसल्याबरोबर चोपले पाहिजे
शहराच्या प्रवेश द्वाराच्या चारही बाजूने कडक पोलिस बंदोबस्त तैनात करून शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना चोप दिल्याशिवाय संचार बंदीचे महत्व कळणार नाही. अशा प्रामाणिक भावना अनेक नागरिकांनी सकाळ शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. अन्यथा संचार बंदीचे नियम धाब्यावर बसल्यासारखे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे .संचारबंदी नसल्यासारखेच वाटत असून केवळ अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने नागरिकांनी बंद ठेवले आहेत.

मुख्य रस्तेच बंद करावे
शहराचा चारही बाजूने मुख्य रस्त्यांवर पोलिस तैनात केले पाहिजे. तेथूनच गावात प्रवेश होणार नाही तर गावात गर्दी होणार नाही. पोलिस बंदोबस्त आहे ,मात्र तो शहरातील चौकांमध्ये आहे. त्यामुळे शहराबाहेरूनच कोणालाही प्रवेश देऊ नये, खरोखर रूग्ण असेल त्यांनाच प्रवेश द्यावा.

संचारबंदी आहे. असे वाटत नाही. पोलिस बंदोबस्तावर आहेत. मात्र नागरिक बिनधास्त फिरतांना दिसत आहेत. भाजीपाला, किराणाही बंद केले पाहिजे. तरच संचारबंदीचा फायदा होईल, अन्यथा भाजीपाला ,किराणा दुकानदार कमाई करताहेत. व दुसरे व्यापारी घरात बसले आहेत. हा अन्याय आहे.सर्वांना समान न्याय दिला जावा.
विक्रम महाजन- व्यावसायिक, नंदुरबार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Nandurbar Marketplace under the name of buying essential goods