esakal | नंदुरबारमध्ये रंगतेय मेडिकल कॉलेज मंजुरीच्या श्रेयाचे बॅनर वॉर 
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar medical collage

राज्यात चार मेडिकल कॉलेज मंजूर झाली होती. त्यात नंदुरबारचाही समावेश होता. तत्कालीन आघाडी शासनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. विजयकुमार गावित यांना वैद्यकीय शिक्षणमंत्रिपद बहाल केले होते.

नंदुरबारमध्ये रंगतेय मेडिकल कॉलेज मंजुरीच्या श्रेयाचे बॅनर वॉर 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयास साधारण ११ वर्षांनंतर का असेना मंजुरी मिळाली. अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करीत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करून १०० विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाला प्रवेश देण्यात येणार आहे. ही जिल्ह्यातील जनतेसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. मात्र, मंजुरी मिळताच त्याच्या श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनर झळकवून श्रेयाचे वॉर सुरू केले आहे. 
नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालय तत्कालीन मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या विकासकामातील यादीत प्रथम क्रमांकावर असलेला ड्रीम प्रोजेक्ट आहे हे सर्वश्रुत आहे. २००९ मध्ये राज्यात चार मेडिकल कॉलेज मंजूर झाली होती. त्यात नंदुरबारचाही समावेश होता. तत्कालीन आघाडी शासनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. विजयकुमार गावित यांना वैद्यकीय शिक्षणमंत्रिपद बहाल केले होते. त्या मंत्रिपदाच्या संधीचे सोने करीत वैद्यकीय महाविद्यालयाला प्राधान्य दिले. 

डॉ. गावित, खासदार गावित यांचे प्रयत्न 
सध्या महाविकास आघाडीचे शासन असले, तरी राज्यस्तरावर आमदार डॉ. विजयकुमार गावित, खासदार हीना गावित यांनी मेडिकल कॉलेजचा मुद्दा सोडला नाही. हीना गावित यांनी वेळोवेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मागे लागून केंद्राचा ६० टक्के निधी मंजूर करून घेतला. त्यानंतर एनएमसी समितीच्या माध्यमातून आवश्यक बाबी पूर्ण करून घेतल्या. हे त्यांनी यापूर्वीही पत्रकारांना सांगितले आहे. त्यावरून त्यांनी केंद्रस्तरावर प्रयत्न केले. केंद्राकडून मार्ग मोकळा झाल्यावर राज्याच्या आरोग्य विभागाची हमी पाहिजे होती. त्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना भेटून तीही मिळविली, असा त्यांचा दावा आहे. त्यानंतर प्रथम वर्ष प्रवेशाला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. 

श्रेयाचे बॅनर वॉर 
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी मेडिकल कॉलेजसाठी डीपीडीसीमधून तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यांपैकी दीड कोटी वितरित झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे शासन आहे. आरोग्यमंत्री काँग्रेसचे आहेत. त्यामुळे केंद्र शासनाला लागणारी हमी व राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा मंजुरीचा प्रस्ताव त्यांच्यामार्फत बजेटमध्ये जाणार आहे. त्यामुळे पालकमंत्री, आरोग्यमंत्री कॉंग्रेसचे असल्याने प्रवेश मंजुरीचा दावा त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते व पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर झळकविले. त्यानंतर आमदार डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित यांच्या कार्यकर्त्यांनीही चौकात बॅनर लावले. त्यामुळे श्रेयाचे बॅनर वॉर सध्या सुरू आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे