esakal | पोटाला चिमटा किती दिवस द्यायचा; या आगीपुढे कोरोनाचा कहर फिकाच
sakal

बोलून बातमी शोधा

Migration of laborers for village

जिल्ह्यातून पोटासाठी मजुरांचे स्थलांतर नित्याचे झाले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार स्थलांतर रोखण्यासाठी अनेक विविध उपाययोजना करण्यात आल्या; मात्र त्याला आळा बसू शकला नाही.

पोटाला चिमटा किती दिवस द्यायचा; या आगीपुढे कोरोनाचा कहर फिकाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडाळी (नंदुरबार) : एकिकडे कोरोनाचे संकट वाढत असताना पोटाची भूक आता ते भय मानायला तयार नाही, त्यामुळे लॉकडाऊन काळात आपापल्या गावी परतलेल्या मजुरांनी रोजगारासाठी स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. यातील बहुतांश मजुरवर्ग हा गुजरामध्ये चालला आहे. काही नाशिक आणि मुंबईकडे निघाले आहेत. दरम्यान स्थानिक पातळीवर रोजगाराचे प्रशासनाचे प्रयत्न यंदाही दिवास्वप्नच ठरले आहे. 

जिल्ह्यातून पोटासाठी मजुरांचे स्थलांतर नित्याचे झाले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार स्थलांतर रोखण्यासाठी अनेक विविध उपाययोजना करण्यात आल्या; मात्र त्याला आळा बसू शकला नाही. जिल्ह्यात चार आमदार हे खासदार त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री या जिल्ह्यात असून देखील मजुरांचे स्थलांतर थांबू शकलेले नाही. जिल्ह्यातही कापूस आणि पिकांचे नुकसान झाल्याने इथे मिळणारा रोजगारही संपला आहे. आता मजुरांचे स्थलांतर होत आहे तेथेही अगोदरच कोरोनाचा कहर आहे असे असताना या मजुरांकडे तेथील प्रशासन लक्ष देईल काय हाही संशोधनाचा विषय आहे.

रोजगाराच्या वाटा बंद 
एकीकडे भूक वाढत असून दुसरीकडे रोजगाराच्या वाटा बंद होत आहे. स्थानिक ठिकाणी मिळणारा रोजगार मंदीच्या सावटाखाली आल्यामुळे आहे त्या परिस्थितीत जो तो आपली गुजराण करीत आहे. पाच महिन्याचा मोफत शिधावाटप बंद झाल्यानंतर काय असा प्रश्न मजुरांपुढे आहे. त्यासाठी आर्थिक चणचण भासत आहे. जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामांचा देखावा झाला, काही मजुरांनी या योजनेत नोंदणी केली. काम करूनही पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे प्रपंच चालवावा कसा असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. 

रोजगार हमीचा नुसता देखावा 
जूनच्य सुरवातीला जिल्ह्यात नवापूर तसेच काही ठिकाणी मनरेगाच्या कामांना सुरुवात झाली. परंतु काम करूनही या मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने त्यांनी पाठ फिरवली. गुजरातसह इतर जिल्ह्यात मजुरांना भरपूर काम उपलब्ध होत असल्यामुळे व रोजंदारीही दिवसाआड मिळत असल्याने त्यांचा ओढा तिकडे असतो.तीच पध्दत रोहयोसाठ राबवल्यास याठिकाणी मजुरांचे स्थलांतराला आळा बसेल असे मजुरांचे म्हणणे आहे.