वैद्यकीय महाविद्यालयांसाठी लवकरच १३० कोटी : ॲड. के. सी. पाडवी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे दुर्गम भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. लवकरच या केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, आरोग्य केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल.

नंदुरबार : जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक मजबूत करण्यासाठी लवकरच २० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासनाकडून १३० कोटींचा निधीही लवकर मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी रविवारी (ता. १२) दिली. 
राणीपूर (ता. शहादा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ. हीना गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, सभापती जयश्री पाटील, बांधकाम सभापती अभिजित पाटील, पंचायत समितीच्या सभापती बायजाबाई भिल, रतन पाडवी, दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. डी. एन. बोडके आदी उपस्थित होते. 
मंत्री पाडवी म्हणाले, की प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे दुर्गम भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. लवकरच या केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, आरोग्य केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. आरोग्य, शिक्षण आणि पाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येत असून, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यतील दुर्गम भागांचा विकास करण्यासाठी अंदाजपत्रकातही तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम केल्याने दुर्गम भागात चांगली सेवा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी म्हणाल्या, की आरोग्य केंद्रासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि मनुष्यबळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. एक महिन्याच्या आत साधनसामग्री आणि रुग्णवाहिका उपलब्ध होईल. या केंद्रामुळे ग्रामीण भागात चांगली सेवा मिळेल. खासदार डॉ. गावित म्हणाल्या, की राणीपूर आरोग्य केंद्रामुळे तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटकांना संकटाच्यावेळी तत्काळ सेवा मिळू शकेल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आरोग्य केंद्राची उभारणी होत असल्याने आरोग्य सेवा अधिक बळकट होईल. राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्य सुविधा सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे, असेही त्यांनी सांगितले. 
प्रारंभी मंत्री श्री. पाडवी यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. त्यांनी आरोग्य केंद्राची माहिती घेतली व चांगल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आरोग्य केंद्राच्या परिसरात ॲड. पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar MLA padvi medical collage 130 carrore fund