वन अतिक्रमणाचा मुद्दा प्रश्‍न मार्गी लावणार : आमदार पाडवी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

वन अतिक्रमण धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असून वन अतिक्रमण मुद्द्याचा सातत्याने पाठपुरावा करुन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू;

नंदुरबार : वन अतिक्रमण धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्याबाबत सकारात्मक कार्यालयीन हालचाल होण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक लावण्याची विनंती शासन, प्रशासनाला करण्यात येईल. वन अतिक्रमण धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असून वन अतिक्रमण मुद्द्याचा सातत्याने पाठपुरावा करुन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू; असे आश्वासन आमदार राजेश पाडवी यांनी दिले.

अमोनी (ता. तळोदा) येथे वन अतिक्रमण धारकांची बैठक झाली; त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सदस्य तथा वनहक्क समितीचे अशासकीय सदस्य दाज्या पावरा, यशवंत पाडवी, बळीराम पाडवी, भिखा पाडवी, छगन कोठारी, चंदन पाडवी, दिलीप पावरा, ग्राम पंचायत सदस्य काळूसिंग वळवी, पिसा तळवी, गुड्डू वळवी आणि कालिबेल, अमोनी, जांबईपाडा, रानमहू व रोझवे प्लॉट येथील वन अतिक्रमण धारक उपस्थित होते. यावेळी दाज्या पावरा यांनी सांगितले, की वन अतिक्रमण विषयात अभ्यास करुन योग्य तो प्रस्ताव सादर करुन वनदावे मंजूर करण्याकडे लक्ष असेल. महसूल झालेली जमीन, अद्याप अतिक्रमण धारकांकडे ताब्यात असलेल्या जमिनी ह्यावर योग्य ती कार्यवाही करण्यास येईल. यावेळी यशवंत पाडवी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

अतिक्रमण धारकांनी वाचला समस्यांचा पाढा
यावेळी वन अतिक्रमण धारकांनी समस्यांचा पाढा वाचल. यात प्रामुख्याने असंख्य वन अतिक्रमण धारकांना सातबारा उतारा मिळाला नसल्यामुळे बँका पीक कर्ज देत नाही. अनेक योजनांचा लाभापासून वंचित राहावे लागते. वर्षानुवर्ष वनदावे प्रलंबित असून केवळ कागदी घोडे नाचवित, केवळ आश्वासन दिले जातात असे सांगितले. चंदन पाडवी यांनी आभार व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar mla rajesh padvi statement farest encroachment issue