esakal | खून झाला; पोलिसांनी वेडसर व्यक्‍तीला घेतले ताब्‍यात, पण पत्‍नी म्‍हणतेय...
sakal

बोलून बातमी शोधा

murder case

खडकीचा आमदरीपाडा (ता. अक्राणी) येथील रहिवासी जिऱ्या हुनाऱ्या रावताळे हा खडकीचा गुराडीपाडा शिवारात राजल्या पावरा याच्या घराजवळ मृतावस्थेत आढळून आला. मृताचा भाऊ मेरवान हुनाऱ्या रावताळे हा दोंडाईचा येथे मोलमजुरीसाठी वास्तव्यास आहे. त्याला म्हसावद पोलिसांनी फिर्यादी बनवून खुनाच्या गुन्ह्यात खडकी गावातील वेडसर, मतिमंद असलेला प्रकाश उर्फ सान्या छगन नाईक याला संशयित आरोपी म्हणून अटक केली.

खून झाला; पोलिसांनी वेडसर व्यक्‍तीला घेतले ताब्‍यात, पण पत्‍नी म्‍हणतेय...

sakal_logo
By
शांतीलाल जैन

म्हसावद (नंदुरबार) ः खडकीचा गुराडीपाडा (ता. अक्राणी) शिवारात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात एका वेडसर, मतिमंद व्यक्तीस म्हसावद पोलिसांनी अटक करण्यात आली. मात्र मृताची पत्नी व भाऊ यांनी खडकीचा दुकानपाडा येथील दोन व्यक्तींनीच खून केल्याचे निवेदन विशेष पोलिस महानिरीक्षक व शहादा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देऊन खऱ्या आरोपींना अटक करावी अशी मागणी केली. 

खडकीचा आमदरीपाडा (ता. अक्राणी) येथील रहिवासी जिऱ्या हुनाऱ्या रावताळे हा खडकीचा गुराडीपाडा शिवारात राजल्या पावरा याच्या घराजवळ मृतावस्थेत आढळून आला. मृताचा भाऊ मेरवान हुनाऱ्या रावताळे हा दोंडाईचा येथे मोलमजुरीसाठी वास्तव्यास आहे. त्याला म्हसावद पोलिसांनी फिर्यादी बनवून खुनाच्या गुन्ह्यात खडकी गावातील वेडसर, मतिमंद असलेला प्रकाश उर्फ सान्या छगन नाईक याला संशयित आरोपी म्हणून अटक केली. फिर्यादीत मृताने आरोपीचे बांबूचे झाड कापल्यावरून वाद झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र मृताचा भाऊ मेरवान रावताळे व मृताची पत्नी राहलीबाई जिऱ्या उर्फ जलसिंग रावताळे यांनी दिलेल्या निवेदनात अटक केलेला आरोपी खरा नसून फिर्यादीमध्ये लिहिलेले कारणही खोटे असल्याचे नमूद केले आहे. खऱ्या आरोपींना पोलिस पाठिशी घालत असल्याचा आरोप करत चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा घडत असल्याचे म्हटले आहे. 

गुन्ह्याची वस्तुस्थिती अशी 
खडकीचा दुकानपाडा येथील रामा रेहमसिंग नाईक, केलसिंग डेड्या नाईक हे दोघी मावसभाऊ असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सरपंच, पोलिस पाटील यांनी सांगितले. केलसिंग याचा मृत भाऊ हुऱ्या याची मुलगी व खून झालेल्या इसमाचा मुलगा यांचा साखरपुडा तीन वर्षापूर्वी झाला होता. साखरपुड्यात रीतीरिवाजाप्रमाणे हुंड्याची रक्कम तीनहजार रुपये केलसिंग यास दिला होता. मात्र केलसिंग याने भावाच्या मुलीचे लग्न परस्पर फलाई गावाच्या खोंड्या नाईक याच्या मुलाशी लावून दिले होते. मृताने दिलेली हुंड्याची रक्कम परत मिळावी यासाठी संशयिताकडे तगादा लावला होता. 

हुंड्याच्या रक्‍कमेवरून झाला वाद 
ऑगस्टला खडकीचा दूकानपाडा जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात परिसरातील दोन मुली व दोन मुले यांनी पळून जाऊन रीतीरिवाजाप्रमाणे लग्न केले होते. वाद मिटवण्यासाठी दोन्ही तिन्ही पाड्याचे प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच, पोलिसपाटील होते. पंच मंडळीत खडकीचे पोलिसपाटील, आलमसिंग नाईक, काहऱ्या नाईक, शिवाजी नाईक, सकीराम पावरा यांचेसह ते लोक उपस्थित होते. यावेळी सर्वांसमक्ष मृताने रामा नाईक, केलसिंग नाईक यांच्याकडून हुंड्याची रक्कम तीन हजार केव्हा देणार अशी विचारणा केल्याचा राग येऊन दोघांनी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणातच जिऱ्या रावताळे यास छत्रीचा दांड्याने, दगडाने, लाथाबुक्‍क्‍यांनी छातीवर, कपाळावर बेदम मारहाण करून चिखलात तोंड दाबून धरले होते. परिणामी मृताच्या नाकातून, कानातून, तोंडातून रक्त निघत होते. यावेळी असलेले प्रत्यक्षदर्शीही सत्यतेचा बाजूने असले तरीही म्हसावद पोलिसांचा हेकेखोरपणा आडकाठी ठरत आहे. त्यास गावातील लोंगा चांद्या नाईक, मोना जोरसिंग नाईक यांनी उचलून आमदरी पाड्याच्या रस्त्यापर्यंत सोडून आले होते. मात्र जिऱ्या रावताळे हा घरी पोहचू शकला नाही, तो रस्त्यातच मृतावस्थेत आढळून आला. त्यावरून मयताची पत्नी राहलीबाई रावताळे व मयताचा भाऊ मेरवान रावताळे यांनी अटक केलेला आरोपी खरा नसून संशयित आरोपी रामा नाईक व केलसिंग नाईक यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे