नंदुरबार जिल्‍ह्‍याची पिछाडी; लसीकरणात शेवटून तिसऱ्या स्थानी

नंदुरबार जिल्‍ह्‍याची पिछाडी; लसीकरणात शेवटून तिसऱ्या स्थानी
covid vaccine
covid vaccinecovid vaccine

तळोदा (नंदुरबार) : एकीकडे महाराष्ट्र राज्य लसीकरणाबाबत (Vaccination) देशात प्रथम क्रमांकावर असताना आदिवासी बहुल नंदुरबार जिल्हा (Nandurbar district) मात्र राज्यात शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात लसीकरणाला वेग प्राप्त व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते सबंधित विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी भरपूर प्रयत्न करीत असताना लस घेण्याबाबत नागरिकांमधील गैरसमज, नागरिकांची उदासीनता प्रशासनाचा प्रयत्नांवर पाणी फेरत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरीच कमी आहे. (covid vaccination last third rank in state)

covid vaccine
मुलीला अश्‍लिल हावभाव; जामनेरात तणाव, दगडफेकीत एकजण जखमी

नंदुरबार जिल्ह्यात जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फ्रंटलाइन वर्कस, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली. मे महिन्यापासून १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणालाही सुरवात झाली आहे.

ज्‍येष्‍ठांचे केवळ १४ टक्‍केच लसीकरण

साधारणतः ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ वर्षांपुढील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढत्या वयानुसार कमी होते. त्यामुळे शासनाने ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाला प्रथम प्राधान्य दिले. मात्र आत्तापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात ४५ वर्षांपुढील नागरिकांचे फक्त १४.५७ टक्केच लसीकरण झाले आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अंदाजे २० लाख असून, ४५ वर्षांपुढील नागरिकांची संख्या अंदाजे सहा लाख आहे. त्यांपैकी आत्तापर्यंत केवळ ८७ हजार ४५१ नागरिकांनीच लसीचा पहिला डोस घेतला असून, दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या याहूनही कितीतरी कमी आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा लसीकरणाबाबत राज्यात खालून (शेवटून) तिसऱ्या स्थानी आहे.

covid vaccine
लसीकरणासाठी दुसऱ्या दिवशीही रांगा; ज्येष्ठांचे हाल सुरूच

नागरीकांमध्ये उदासिनता

जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी भरपूर प्रयत्न करीत आहेत. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी बोलीभाषेत लसीकरणाबाबत जनजागृती केली असून, शिक्षकांमार्फत घरोघरी सर्व्हे करीत नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र लस घेण्याबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज व नागरिकांची उदासीनता प्रशासनाचा प्रयत्नांवर पाणी फेरत असल्याचे बोलले जात आहे.

लोकप्रतिनिधींची अनास्था

नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी अद्यापही लस घेतली नसल्याचे बोलले जात आहे. लसीकरण ही बाब पूर्णतः ऐच्छिक आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी लस घेतल्यास व त्याची प्रसिद्धी केल्यास, त्या संबंधित लोकप्रतिनिधीचा प्रभाव असलेल्या भागात सकारात्मक संदेश जात, लोकप्रतिनिधींचे अनुकरण त्यांचे समर्थक करू शकतात व त्यातून निश्चितच लसीकरणाची टक्केवारी वाढू शकते. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी लस घेणे महत्त्वाचे ठरू शकते.

राज्यात कोल्हापूर प्रथम

४५ वर्षांपुढील नागरिकांच्या पहिल्या डोसच्या लसीकरणाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर, सांगली जिल्हा द्वितीय, तर सातारा जिल्हा तृतीय क्रमांकावर असून, त्यानंतर पुणे, नागपूर, भंडारा, वर्धा, मुंबई, सिंधुदुर्ग, वाशीम, ठाणे, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, अमरावती, नाशिक, नगर, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, रत्नागिरी, धुळे, जालना, रायगड, यवतमाळ, परभणी, बीड, गडचिरोली, जळगाव, सोलापूर, नंदुरबार, पालघर, हिंगोली असा क्रमांक लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com