esakal | ऑक्सिजन निर्मितीत नंदुरबार होतोय स्‍वयंपुर्ण; जिल्‍हाधिकारींच्या तत्‍परतेने होतेय शक्‍य
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar collector oxygen plant

ऑक्सिजन निर्मितीत नंदुरबार होतोय स्‍वयंपुर्ण; जिल्‍हाधिकारींच्या तत्‍परतेने होतेय शक्‍य

sakal_logo
By
टिम इ सकाळ

नंदुरबार : कोरोना बाधित अनेक रूग्‍णांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासत आहे. अशात ऑक्‍सिजनचा तुटवडा देखील तितक्‍याच प्रमाणात जाणवत आहे. परंतु, आदिवासी म्‍हणविणाऱ्या नंदुरबार जिल्‍ह्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या तत्‍परतेने ऑक्‍सिजन निर्मितीमध्ये जिल्‍हा स्‍वयंपुर्ण होत आहे.

कोरोनामुळे राज्यात ऑक्सिजनची स्थिती गंभीर आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळणे मुश्‍किल झाले असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र ऑक्सिजनचा प्रश्‍न निर्माणच झाला नाही. त्याला कारण म्हणजे येथील जिल्हा रुग्णालयात दोन व शहाद्यातील कोविड केअर सेंटरलगत एक असे तीन हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. तर लवकरच तळोदा, नवापूर येथेही ऑक्सिजन प्रकल्प साकारण्याचा मानस असून, महिनाभरात ते पूर्ण होतील. यामुळे सद्यःस्थितीत जिल्ह्यातील रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी ५० टक्के गरज यातून भागत आहे. त्यामुळे हे ऑक्सिजन प्रकल्प जिल्ह्यातील रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहेत. तसेच इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत.

हवेतून ऑक्‍सिजन निर्मितीचे प्रकल्‍प

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे राज्यात सर्वत्रच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आधीच तोकडी ठरत असल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे तीन प्रकल्प कार्यान्वित केले. एका प्रकल्पातून सुमारे १२५ जम्बो सिलिंडर इतका ऑक्सिजननिर्मिती होत असून, तिन्ही प्रकल्पांतून ३७५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होत आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात एकूण मागणीच्या सुमारे ४० ते ५० टक्के ऑक्सिजन निर्मिती होत आहे. सध्या जिल्ह्याच्या सर्व शासकीय रुग्णालय आणि कोरोना कक्षांना सुमारे १००० ते १२०० जम्बो सिलिंडरची गरज आहे. यापैकी सुमारे ४०० सिलिंडर नंदुरबार व शहाद्यामध्येच निर्माण होत आहेत. तर उर्वरित गरज ही धुळे, औरंगाबाद, गुजरात व मध्य प्रदेशातून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करून भागवली जात आहे.

चारशे ऑक्‍सिजन बेड

सध्या नंदुरबार जिल्हा रुग्णालयात २००, शहादा येथे १००, नवापूर येथे ८० तळोद्यात ५० ऑक्सिजन बेड असे सुमारे पावणेचारशे ते चारशे ऑक्सिजन बेड आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करणारे दोन प्रकल्प, तर शहादा येथील कोविड केअर सप्टेंबरमध्ये एक प्रकल्प कार्यान्वित आहे. यातून शहादा व नंदुरबारची ऑक्सिजनची गरज भागवली जात आहे.

लिक्विड ऑक्सिजन जम्बो सिलिंडरनिर्मिती

मेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयात दोन, शहादा, तळोदा व नवापूर असे प्रत्येकी एक याप्रमाणे तीन असे एकूण पाच ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. मात्र तरीही या प्रकल्पांवर विसंबून न राहता जिल्हा प्रशासनाने एका कंपनीसोबत करार करुन लिक्विड ऑक्सिजन निर्मिती जम्बो प्रकल्पाच्या उभारणीच्या कामाला सुरवात केली आहे. २० ते २५ दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. यातून सुमारे २५० जम्बो सिलिंडर निर्मिती होणार आहे. यामुळे जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागणार आहे.

जिल्ह्यात सद्यःस्थितीत सुमारे ३७८ ऑक्सिजन बेड आहेत. तीन ऑक्सिजन प्रकल्पातून ३७५ जम्बो सिलिंडर निर्माण करत आहोत. जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी ४० ते ५० टक्के गरज भागत आहे. उर्वरित सिलिंडर धुळे, औरंगाबाद, गुजरातमधून मागवून पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत तळोदा व नवापूर येथे दोन प्रकल्प प्रस्तावित असून, एक जम्बो लिक्विड प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. यामुळे ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होणार आहोत. सद्यःस्थितीतही जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही.

- डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी

loading image