esakal | होय, शेकडोंचा जीव वाचविण्यासाठी केला गुन्हा; नवाब मलिकांच्या आरोपाचे खंडन

बोलून बातमी शोधा

nawab malik shirish choudhary
होय, शेकडोंचा जीव वाचविण्यासाठी केला गुन्हा; नवाब मलिकांच्या आरोपाचे खंडन
sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : कोरोनाने दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. संसर्गाने हतबल झालेल्या कुटुंबांना वाचविण्यासाठी व मृत्यूचा दाढेतून रूग्णाला बाहेर काढण्यासाठी जनहिताचा भावनेतून रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन ना नफा ना तोटा या तत्वावर गरजूंना उपलब्ध करून देत खानदेशातील शेकडो नागरिकांचे जीव वाचविले. ते नेक काम गुन्हा ठरवत असेल तर होय, मी गुन्हा केला आहे आणि तो पुन्हा करेल, असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

हिरा ग्रुपच्या सदर्भात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनचा मोठा साठा एका हॉटेलमध्ये ठेवला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले असल्याचा आरोप केला. त्या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. श्री. चौधरी म्हणाले, मंत्री नवाब मलिक यांनी वास्तविकता सोडून जे आरोप केलेत त्याचे मी खंडन करतो. रेमडेसिव्‍हिर इजेक्शनचा साठा आणि त्याचा काळाबाजारच्या संदर्भात केलेले आरोप हे घृणास्पद व मनाला चीड आणणारे आहे.

सर्वांवरच ताण

आमच्या ग्रूपच्या माध्यमातून विविध व्यवसायापैकी हा एक व्यवसाय असून आमचे औषधी उत्पादक कंपनीशी सलोख्याचे संबंध आहेत. जे काही औषधी सहयोगीच्या माध्यमातून निर्यात करतो, त्यात अनेक औषधांसहित रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनही आहे. दीड महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यू तांडव चालले आहे. अनेक कुटुंबे त्यात उद्ध्वस्त होत आहेत, शासकीय आरोग्य असू द्या, की प्रशासकीय यंत्रणा, त्यांच्यावर प्रचंड ताण पडलेला असून ती यंत्रणा खिळखिळी झाली आहे. मागच्या एक महिन्यापासून बरेचदा तोटा सहन करून नियमानुसार रुग्णांना इजेक्शन अल्पदरात उपलब्ध करून दिले. आमच्याकडे रीतसर सहयोगी, भागीदार तसेच काही कंपन्यांवरील परवान्यावरचा साठा उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु, काही दिवसापासून कोरोनाची लाट प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे रेमडेसिव्‍हिरचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत होते. इजेक्शन काळ्याबाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात होते, म्हणून काहीप्रमाणात असलेल्या इम्पोर्टचा साठा रुग्णांपर्यंत पोहचवला. त्यातून शेकडो जणांचा जीव वाचला. यात आम्ही काय गुन्हा केला?

गरिबांचे प्राण वाचले हेच समाधान

विदेशात जाणारे इंजेकशन परक्यांचे प्राण वाचवणार की भारतीयांचे? कायद्याच्या चौकटीत राहिलो असतो, तर हजारो लोकांना प्राणास मुकावे लागले असते. यासाठी जिल्हाधिकारी, संबधित मंत्री, विरोधी पक्ष नेते या सर्वाना विनंती केली. निर्यात होणारा साठा भारतीय जनतेचे प्राण वाचवू शकतो, म्हणून त्यासंदर्भात आम्ही त्यांची व्यक्तिशः भेट पण घेतली होती. प्रत्येक गोष्ट कायद्यात बसवणे शक्य नाही. अजूनपर्यंत त्यांचा निर्णय झाला नाही. हे इजेक्शन रुग्णापर्यंत काही प्रमाणात दिली, त्यात सर्वसामान्य जनतेसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पण जीव वाचला.

गुन्हा दाखल केला तरी घाबरणार नाही

निर्यात होणारा साठा माझ्या मतदार संघात लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्यपार पाडले. कुठल्याही प्रकारचा कर न बुडवता तसेच कुठलेही चुकीचं काम न करता एक्स्पोर्ट होणार साठा हा रुग्णांपर्यंत पोहचविला, त्यात हजारो लोकांचे जीव वाचले. त्यासाठी माझ्यावर असे एक काय अनेक गुन्हे जरी दाखल केले तरी मी घाबरणार नाही. जे केले ते जनतेचा प्राण वाचवण्यासाठी केले, परिस्‍थिती ही आवाक्या बाहेर गेल्याने स्वखर्चातून कमी दरात, तोट्यात रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरविले. यात जर मंत्र्यांना गुन्हा वाटत असेल तर आम्ही तो गुन्हा केला आहे. हजारो गरीब रुग्णाचे प्राण वाचवले याचेच मला समाधान आहे, असे त्यांनी सांगितले.

संपादन- राजेश सोनवणे