esakal | झाडांच्‍या फांद्यांना सलाईन; रूग्‍ण स्‍वतःची खाटच घेवून येत घ्‍यायचे इलाज
sakal

बोलून बातमी शोधा

open hospital

झाडांच्‍या फांद्यांना सलाईन; रूग्‍ण स्‍वतःची खाटच घेवून येत घ्‍यायचे इलाज

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिवपूर येथे १५ दिवसांपासून डॉक्टरांनी मंडपात अंथरलेल्या ताडपत्रीवर रुग्णांना झोपवून व झाडांच्या फांद्यांना सलाईन लावून उपचार केले. मंडपातील या दवाखान्यात सुमारे पावणे दोनशे टायफॉईडच्या रुग्णांना बरे करण्यात आले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी एक हॉल उपलब्ध करून दिला. गरज असणाऱ्या रुग्णांना परिसरातील आरोग्य केंद्रातही उपचाराची सोय करून दिली आहे. यामुळे मंडपातील दवाखाना आता एका हॉलमध्ये सुरू झाला आहे. गावातील डॉक्टरांच्या या सेवेने समाधान व्यक्त होत आहे.

शिवपूर (ता. नंदुरबार) गावाची लोकसंख्या हजारापर्यंत असून, निम्मे गाव साथीच्या आजाराने हैराण झाले. सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने गावकरी दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यास धजेना. यामुळे येथील डॉ. नीलेश वळवी यांनी रुग्णांना बोलावून एका मोकळ्या जागेत मंडपात दवाखाना सुरू केला. रुग्णांची टायफॉईडची चाचणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले.

घरासमोरही इलाजासाठी मंडप

शिवपूरच्या मंडपात सुरू असणाऱ्या दवाखान्यात गुजरातमधील सायला, मोग्राणी, टाकली, वडली, भिलभवाली, नासेरपूर, मौलीपाडा या निझर तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील नंदुरबारमधील पिंपलोद, भवाली, शिवपूर, लोय, धानोरा गावचे शेकडो रुग्ण आहेत. गावकऱ्यांनी उभारलेल्या मंडपासह प्रत्येकाच्या घरापुढील मंडपात रुग्णांवर उपचार सुरू होते. अनेकजण झाडाला सलाईन अडकवून झाडाखाली बसून उपचार घेत होते.

स्‍वतःची घाट घेवून यायचे रूग्‍ण

मंडपातील दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्याने येथे स्वत:ची खाट घेऊन यायची आणि उपचारासाठी दाखल व्हायचे. अनेकांवर येथे उपचार करण्यात आले. गावातील मंडपात का असेना, पण वेळेवर उपचार झाल्याने एकही रुग्ण दगावला नाही. कोणीही लक्ष देत नव्हते. मात्र, डॉ. वळवी यांनी रुग्णांवर योग्य उपचार केल्याने बरे होऊन रुग्ण घरी जात होते. जाताना डॉक्टरांबद्दल समाधान व्यक्त करीत आहे. दरम्यान, याबाबत काही जणांनी हरकती घेतल्याने दोन दिवसांपासून मंडपातील दवाखान्यात उपचार करणे बंद केले होते. आता हा दवाखाना गावातील एका हॉलमध्ये सुरू झाला असून. तेथे रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.

शिवपूर येथे रुग्णांना टायफॉईड, पोटदुखी आदी त्रास जाणवत होता. रुग्णसंख्या मोठी असल्याने उपचारासाठी पुरेशा सुविधा नव्हती. गावातच मंडप थाटून दवाखाना सुरू केला. १५ दिवसांत सुमारे पावणे दोनशे रुग्णांवर उपचार केले असून, ते बरे झाले आहेत.

-डॉ. नीलेश वळवी, सहाय्यक अधिव्याख्याता, वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीपासून या ठिकाणी मोठे हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेज नसल्याने जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा आहे. अनेक वर्षांपासून ३५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागात याहूनही वाईट परिस्थिती आहे. शिवपूर गावात डॉ. नीलेश वळवी यांनी सुरू केलेली कोविड काळातील आरोग्य सेवा महत्त्वाची असून, प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे.

-डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी, नंदुरबार

loading image