डोनर आणा अन्‌ रक्ताची पिशवी न्या..जाणवतोय रक्‍ताचा तुटवडा 

धनराज माळी
Thursday, 5 November 2020

खासगी रक्तपेढ्यांमध्ये सुमारे एक हजार २०० ते दीड हजारांना रक्ताची पिशवी मिळते. गरीब रुग्णांना ते विकत घेणे न परवडणारे आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत सद्यःस्थितीमध्ये एकही रक्ताची पिशवी नसल्याने गरजू रुग्णांच्या नातेवाइकांची होरपळ होत आहे. रक्त मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील अनेकांना खासगी रक्तपेढीतून रक्त आणावे लागत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीतून गरजूंना रक्तपुरवठा होतो. खासगी रक्तपेढ्यांमध्ये सुमारे एक हजार २०० ते दीड हजारांना रक्ताची पिशवी मिळते. गरीब रुग्णांना ते विकत घेणे न परवडणारे आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत बुधवारी (ता. ४) कोणत्याही रक्तगटाची एकही पिशवी उपलब्ध नव्हती. 
 
डोनर आणा, रक्ताची पिशवी न्या! 
अनेक गरजू रुग्णांचे नातेवाईक रक्त घेण्यासाठी रक्तपेढीत आले होते. या वेळी रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांकडून ‘डोनर घेऊन या व पिशवी घेऊन जा’ असे सांगण्यात आले. बाहेरगावाहून आलेल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू असताना, दुसऱ्या बाजूला डोनर कसा मिळणार कसा, असा प्रश्न पडतो. यामुळे अनेक जण खासगी रक्तपेढीतून पैसे देऊन रक्त आणून रुग्णाचा जीव वाचविण्याची धडपड करीत आहेत. 
 
रक्‍तदान शिबिरांची गरज 
नंदुरबार व शहादा अशा दोन ठिकाणी खासगी रक्तपेढ्या आहेत. या ठिकाणी बऱ्याचदा रक्त उपलब्ध होते. येथील कर्मचारी स्वतः गावोगावी फिरून दात्यांना रक्तदानाचे आवाहन करतात. यामुळे साहजिकच खासगी रक्तपेढ्यांमध्ये बऱ्याचदा रक्त उपलब्ध होते. मात्र, जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांकडून तसा प्रयत्न होत नाही किंवा झालाच तर त्यात सातत्य दिसून येत नाही. परिणामी, जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत एकही रक्तपिशवी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

सोशल मीडियावर अवलंबून 
नंदुरबार जिल्ह्यात काही युवकांनी रक्तदानाची चळवळच सुरू केली आहे. यासाठी सोशल मीडियावर विविध रक्तगटाच्या दात्यांचा ग्रुप बनविला आहे. यावर गरजू रुग्णांना रक्त पाहिजे असल्यास ग्रुपमधील एखाद्या सदस्याशी संपर्क साधल्यावर अनेक जण स्वयंस्फूर्तीने रक्तपेढीत रक्तदानासाठी जातात. जिल्हा रक्तपेढीतील कर्मचारी केवळ सोशल मीडियावरच आवाहन करतात. यामुळे बऱ्याचदा रक्तदाते उपलब्ध होतीलच असे नाही. यामुळे नुसतेच सोशल मीडियावर अवलंबून न राहता जिल्हा रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदानासाठी आवाहन करणे व शिबिर घेणे गरजेचे आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar no blood donation camp and not available blood