नंदूरबार जिल्ह्यात महिन्याभरातच कोरोना बाधितांची संख्या चौपट 

धनराज माळी
Saturday, 5 September 2020

संपर्क साखळीमुळे ती संख्या रोखणे प्रशासनालाही शक्य झाले नाही. लॉकडाऊन, संचारबंदी यासह सर्वच उपाययोजना करूनही कोरोनाची संख्या मात्र गेल्या महिनाभरात झपाट्याने वाढली आहे. 

नंदुरबार ः कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोजचे शंभर सव्वाशे व्यक्तींचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात वाढले नाहीत एवढे रूग्ण गेल्या महिनाभरात झपाट्याने वाढले आहेत. जिल्हा रूग्णालयाचा अहवालानुसार ५ ऑगष्टला ८६० रूग्ण संख्या होती व ३९ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तर तीच संख्या आज महिनाभरानंतर चार पटीने व दुपट्टीने वाढली आहे. आजमितीला पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या साडेतीन हजारावर गेली आहे तर मृतांची संख्या ७९ झाली आहे. त्यामुळे वाढती रूग्ण संख्या चिंता वाढविणारी आहे. तरीही मात्र नागरिक बिनधास्त फिरतांना दिसून येत आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची सुरूवात मार्च महिन्यापासून झाली, मात्र मार्च महिन्यात रूग्ण आढळले नाहीत. ५ एप्रिलला आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ३४ रूग्णांची नोंद होती. त्यामुळे ती संख्या फारशी दखल पात्र मानली जात नव्हती. तरीही प्रशासनाने योग्य ते उपाययोजना राबविल्या. बेडपासून तर ऑक्सिजन, व्हेन्टीलेटर यासह साऱ्याच आवश्यक बाबी उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी वैयक्तिक लक्ष घातले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिले. त्याचाच चांगला सकारात्मक परिणाम होऊन कोरोनाला आहे, तेवढ्याच संख्येवर थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र संपर्क साखळीमुळे ती संख्या रोखणे प्रशासनालाही शक्य झाले नाही. लॉकडाऊन, संचारबंदी यासह सर्वच उपाययोजना करूनही कोरोनाची संख्या मात्र गेल्या महिनाभरात झपाट्याने वाढली आहे. 
 

पॉझिटिव्ह सख्या चारपट 
५ ऑगष्टला पॉझिटिव्हची संख्या ८६० एवढी होती तीत महिनाभरात झपाट्याने वाढ झाली. नंदुरबार शहर व शहादा या दोन्ही शहरांमध्ये दररोजची पॉझिटिव्हची संख्या लक्षणीय होती. दररोज जिल्ह्याचा आकडा शंभरी पार करणारा ठरला.त्यामुळे आजमितीला पॉझिटिव्हचा आकडा तीन हजार पार करून पुढे गेला आहे. त्यामुळे पटीच्या विचार केला तर सर्वसाधारण एका महिन्यात चार पटीने वाढ झाली आहे. मृत्यूची संख्या मागील महिन्यात ३९ होती ती आजच्या स्थितीत ७९ झाली आहे. म्हणजेच मृत्यूचा संख्येत महिनाभरात दुप्पट वाढ झाली आहे. 

महिनानिहाय पॉझिटिव्ह रूग्ण संख्या व मृत्यू 
५ एप्रिल -३४ - ०० 
५ मे - १०६ - ०१ 
५ जून - १७३- ०३ 
५ जुलै- ३६३ -०८ 
५ ऑगष्ट- ८६०- ३९ 
४ सप्टेबर- ३१२५-७९ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar number of corona cases in nandurbar district quadrupled in a month