पिक-अप, आयशरची समोरासमोर धडक; चालक गंभीर 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

नंदुरबार-तळोदा रस्त्यावरील सैनिकी शाळेजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने वाहने रस्त्यावरच उलटली. अपघात घडताच आयशरवरील चालक व सहचालक घटनास्थळावरून फरारी झाले.

नंदुरबार : औरंगाबाद येथून नंदुरबारमार्गे गुजरातकडे दुचाकीचे विविध पार्टस् घेऊन जाणारी आयशर व निझरकडून नंदुरबारकडे दूध घेऊन येणारे पिक-अप यांच्यात शनिवारी (ता. ३१) दुपारी नंदुरबार-तळोदा रस्त्यावरील सैनिकी शाळेजवळ समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. यात पिक-अप वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्यास नंदुरबार येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आयशरचा चालक व इतर एकजण घटनास्थळावरून फरारी झाले. 
दुपारी दूध वाहतूक करणारे पिक-अप वाहन (एमएच ३९, सी ६२०९) गुजरातमधील निझरकडून नंदुरबारकडे येत होते. त्याचवेळी दुचाकीचे पार्टस् घेऊन जाणारे आयशर वाहन (एमएच २०, डीई १११२) हे औरंगाबाद येथून नंदुरबारमार्गे गुजरातकडे जात होती. नंदुरबार-तळोदा रस्त्यावरील सैनिकी शाळेजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने वाहने रस्त्यावरच उलटली. अपघात घडताच आयशरवरील चालक व सहचालक घटनास्थळावरून फरारी झाले. तर पिक-अपवरील वाहनचालकास दुखापत झाल्याने त्यास प्रत्यक्षदर्शींनी नंदुरबार येथील एका खासगी रुग्णालयात नेले. अपघातामुळे मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा 
नंदुरबार-तळोदा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या महिन्याभरात या रस्त्यावरून सात ते आठ अपघात झाले आहेत. या रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या या रस्त्यावरून अधिक असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. 

आयशरच्या नंबरप्लेटमध्ये तफावत 
अपघातग्रस्त आयशरच्या नंबरप्लेटमध्ये तफावत दिसून आली. आयशरच्या दर्शनी भागात नंबरप्लेटवर (एमएच २०, डीई १११२), तर पाठीमागील भागावर (एमएच ३०, डीई ५३९९) असा क्रमांक असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित वाहनाचा नेमका वाहन क्रमांक कोणता, याबाबत शंका उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar pickup van truck accident