
इमारतीचा वापर बंद झाल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना बंदोबस्त अथवा पेट्रोलिंगसाठी रात्री हिंगणी येथील पत्रा पोलिस चौकीचा वापर करावा लागत आहे.
वडाळी ः तोरखेडा (ता. शहादा) येथील पोलिस दूरक्षेत्राची इमारत जीर्ण झाल्याने पोलिसांना झाडाखाली काम करावे लागत आहे. इमारतीचे नवीन बांधकाम व दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष होत आहे. पोलिसांच्या हक्काचा निवाऱ्यासाठी कोण न्याय देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तोरखेडा परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी ब्रिटिशांनी या पोलिस दूरक्षेत्रची स्थापना केली होती. इमारतीचे बांधकाम चुना, दगड, लाकूड व छत कौलारू आहे. यामुळे सततच्या पावसामुळे गळती लागून खराब झाले आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात प्लॅस्टिकचा वापर करून छत झाकावे लागत होते. तीन- चार वर्षांत पावसामुळे इमारतीची दुरवस्था झाली. भिंतींना तडे जाऊन कौलारू चाट मोडकळीस आले. यामुळे या ठिकाणी वास्तव्य करणे धोकादायक असल्याने कर्मचाऱ्यांनी आपले बस्तान भाड्याच्या खोलीत हलविले व दरवाजांना कुलूप ठोकले. मध्यंतरी इमारतीची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या पावसाळ्यात डागडुजीचे पितळ उघडे पडले आणि इमारत नादुरुस्त झाली.
सारंखेडा पोलिस ठाण्यात अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या. मात्र, त्यांनी येथील पोलिस दूरक्षेत्राच्या इमारतीच्या नवीन बांधकामासाठी किती प्रस्ताव पाठवले, हा संशोधनाचा विषय आहे. इमारतीचा वापर बंद झाल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना बंदोबस्त अथवा पेट्रोलिंगसाठी रात्री हिंगणी येथील पत्रा पोलिस चौकीचा वापर करावा लागत आहे. याठिकाणी निवासासाठी दुसरी इमारत नसल्याने कर्मचाऱ्यांना इतरत्र ठिकाणाहून ये- जा करून ड्यूटी करावी लागत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथील कर्मचाऱ्यांच्या हक्काचे निवासासाठी होणारी तारांबळ थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इमारतीच्या नवीन बांधकामासाठी वरिष्ठ व बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या ठिकाणी एक अधिकारी व पाच कर्मचारी कार्यरत आहेत
-चंद्रकांत सरोदे, पोलिस निरीक्षक, सारंगखेडा
तोरखेडा गावाची लोकसंख्या दहा हजार व परिसरातील आठ गावांचा या दूरक्षेत्राशी येतो. येथे लहान- मोठे तंटे उद्भवत असतात. गावाजवळून महामार्ग जात असल्याने अपघात नित्याचे झाले आहेत. येथील इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे कर्मचारी जागेवर थांबत नाही. एखाद्यावेळी अपघात झाल्यास फोनवरून कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी लागते.
-जयसिंग गरुड, शिवसेना गटनेता, तोरखेडा
संपादन- भूषण श्रीखंडे