डाकिया ‘जन-धन’ लाया...! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून टपाल कार्यालयाचे प्रतिनिधी गावात जाऊन पैसेवाटप करीत असून, आठवडाभरात दोन हजार ३९२ खातेदारांना सुमारे ३२ लाख ७२ हजारांचे वाटप करण्यात आले आहे.

नंदुरबार : ‘बडे डाक खाने से आता लाता कभी रुपैया, कभी किताबें दे जाता है मुझ को हँस हँस भैया...’ बालपणीच्या कवितेतील मुन्शीराम डाकियाचे वर्णन आठवण्याचे कारण म्हणजे आजच्या ‘डाकिया’ने संचारबंदीच्या काळात ग्रामीण जनतेला दिलेला दिलासा. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून टपाल कार्यालयाचे प्रतिनिधी गावात जाऊन पैसेवाटप करीत असून, आठवडाभरात दोन हजार ३९२ खातेदारांना सुमारे ३२ लाख ७२ हजारांचे वाटप करण्यात आले आहे. 
डाकसेवेच्या उपयुक्तता तंत्रज्ञान युगात कमी होते की काय, अशी शंका वाटत असताना या विभागाने कात टाकून नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. नव्या सेवांचा समावेश कामकाजात करून वेळोवेळी आपली उपयुक्तताही सिद्ध केली आहे. ‘कोरोना’च्या संकटवेळी बँकेतील गर्दी टाळणे आवश्यक असताना इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने गावपातळीवर आपले काम नेऊन नागरिकांना चांगली सेवा दिली आहे. 

केवळ आधार कार्ड आणि मोबाईल जवळ असला, तरी नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना किंवा अन्य योजनांच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यात जमा झालेली रक्कम काढता येत आहे. इतर सार्वजनिक बँकांमधील रक्कमही काढण्याची सुविधा गावपातळीवर उपलब्ध झाली आहे. या सुविधांसोबत सार्वजनिक बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या १७० प्रतिनिधींतर्फेही गावपातळीवर रक्कम काढण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत ५४ हजार ९५८ खात्यांतील चार कोटी ३५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. 

गावागावांत ‘डाकिया’ची प्रतीक्षा! 
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखेतून प्रतिनिधी परिसरातील तीन ते चार गावांत जाऊन ही सुविधा देतात. एकावेळी एक हजार रुपये काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक प्रतिनिधी एका दिवसात २५ हजारांचे वितरण करू शकतो. गावात अधिक ग्राहक असल्यास त्यांना पैसे वितरित होईपर्यंत गावात ही सुविधा दिली जाते. त्यामुळे शहरात बँकेतील गर्दी कमी होण्याबरोबर नागरिकांचा त्रासही वाचला आहे. विशेषतः गरजू महिला आणि वृद्धांना या सुविधेचा उपयोग होत आहे. त्यामुळे गावात पूर्वीसारखी ‘डाकिया’ची वाट पाहिली जात आहे. 

वृद्ध बँकेत जाऊ शकते नाहीत. त्यांचा त्रास आपल्या सेवेमुळे वाचत असल्याचे समाधान मिळते. त्यांना खरी गरज आहे. शासन आपल्याला मदत करते आहे, याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर पाहता येतो. 
- प्रशांत सोनवणे 
 
‘लॉकडाउन’मुळे बँकेपर्यंत नागरिकांना जाता येत नाही. त्यामुळे गावात जाऊन पैसे दिल्यानंतर त्यांना समाधान वाटते. त्यांचे आपुलकीचे दोन शब्द उत्साह वाढविणारे असतात. 
- सुधाकर जाधव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar postman jan dhan yojna cash distribut