पुजेसाठी मागितला कोंबडा...यानंतर पुजाऱ्याने गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

पूजेसाठी आमंत्रित केले होते. पूजेची सर्व तयारी झाली होती. मान्या राहसे तेथे गेले. मात्र पूजेसाठी कोंबडा कापावा लागतो, तो दिलीपने कापला नाही. त्यामुळे माद्या राहसे हे पूजा न करताच माघारी फिरले.

नंदुरबार : पूजेत कोंबडा मारला नाही म्हणून पूजा न करताच परत जाणाऱ्या पुजाऱ्याचा रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने मारून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका शेतात असलेल्या विद्युत ट्रान्ऱफार्मरजवळ फेकून देण्यात आला. ही घटना चोंदवाडे (ता. धडगाव) येथे घडली. याबाबत दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे. 

क्‍लिक करा - ते एटीएमवर पैसे काढण्यास आले पण आतमध्ये दिसले भलतेच काही 

चोंदवाडे बोरीपाडा (ता. धडगाव ) येथील दिलीप सोन्या पावरा याच्या घरी काल (ता.१२) पूजेचा कार्यक्रम होता. तेथे गावातील मान्या माद्या राहसे (वय ५४, रा.चोंदवाडे बोरीपाडा) यांना दिलीप पावरा याने पूजेसाठी आमंत्रित केले होते. पूजेची सर्व तयारी झाली होती. मान्या राहसे तेथे गेले. मात्र पूजेसाठी कोंबडा कापावा लागतो, तो दिलीपने कापला नाही. त्यामुळे माद्या राहसे हे पूजा न करताच माघारी फिरले. ते घराकडे जात असतांना राहसे यांना दिलीप सोन्या पावरा व अशोक ऊर्फ विरसिंग भाज्या पटले (रा. चोंदवाडे, बोरीपाडा) या दोघांनी शेंगा पटले यांच्या शेताजवळ गाठले. तेथे त्यांच्या डोक्यावर उजव्या बाजूने धारदार शस्त्राने वार केला. त्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. यानंतर दिलीप पावरा व अशोक पटले यांनी खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी मान्या राहसे यांचा मृतदेह तेथून उचलून लगतच पायवाटेला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरलगत टाकून दिला. 

हेपण पहा - वनमजुरच निघाला चंदनचोर

सायंकाळपर्यंत मान्या राहसे घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. धडगाव पोलिसांनी घटनेचा छडा लावला. त्यात मान्या राहसे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपास चक्रे फिरवल्यावर घटनेची माहिती पुढे आली. या प्रकरणी अशोक भाज्या पटले यास अटक केली आहे. तर दिलीप पावरा याने पलायन केले आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. धडगाव पोलिसात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar prayer pujari demand Cock and murder