म्‍हणूनच प्राचार्य चौधरींची उचलले टोकाचे पाऊल

धनराज माळी
Sunday, 18 October 2020

जिजामाता फार्मसी कॉलेजचे प्राचार्य रवींद्र चौधरी यांनी कॉलेजच्या वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेत आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी आज नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात अखेर अकरा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार : जिजामाता महाविद्यालयाच्या फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांच्या आत्महत्येप्रकरणी अकरा जणांविरुद्ध अखेर आज आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यात मुंबई- नाशिक शहापूर व नंदुरबार येथील व्यक्तींचा समावेश आहे.
जिजामाता फार्मसी कॉलेजचे प्राचार्य रवींद्र चौधरी यांनी कॉलेजच्या वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेत आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी आज नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात अखेर अकरा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात डॉ. नयनकिशोर शिंदे (रा. चांदवड), सुभाष राठोड, तांबे सर (दोन्ही रा.नाशिक), सलीन धानोरकर, सौरभ श्रीवास्तव, शंकर मानवतार (तिन्हीजण रा. मुंबई), सुनील महाजन (रा.शहापूर), रवींद्र साळुंखे, कविता साळुंखे (रा. नंदुरबार), मुकेश वाडेकर (नंदुरबार), अनिल रणछोड चौधरी (नंदुरबार) आदींचा समावेश आहे. 

प्रवेश घेतला अन्‌ रक्‍कम देण्यास टाळाटाळ
डॉ. नयनकिशोर शिंदे, सुभाष राठोड, तांबे यांनी मुलीच्या एमबीबीएसच्या प्रवेशासाठी बावीस लाख रुपये घेऊन प्रवेश न करता फसवणूक केली होती. पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. तर सलीन धानोरकर, सौरभ श्रीवास्तव, शंकर मानवतार (तिन्ही रा. मुंबई) या तिघांनी वीस लाख रुपये उसनवार घेतले होते. ते परत केले नाहीत व उडवाउडवीची उत्तरे देत होते. तसेच सुनील महाजन (शहापूर) याच्या त्याच्यासोबत केळीच्या व्यवसायात भागीदारी करून पैसे गुंतवणूक केले होते. त्यातही महाजन याने फसवणूक केली. तर रवींद्र साळुंखे, कविता साळुंखे या दोघांनी दहा लाख रुपये उसनवार घेतले होते, ते परत केले नाहीत. मुकेश वाडेकर याने मेडिकल स्टोअर्स टाकण्यासाठी पैसे घेतले होते, तेही परत केले नाही. अनिल रणछोड चौधरी यानेही उसनवार घेतलेले पैसे परत केलेले नाही. त्यामुळे या सर्वांकडून प्राचार्य चौधरी यांची फसवणूक झाली व पैसे परत मिळाले नाही त्या कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद करत या अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे दरम्यान, अनिल चौधरी मुकेश वाडेकर रवींद्र साळुंखे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar principal suicide case elevan parson fir