प्राध्यापकांना कामे सोपवून प्राचार्यांची महाविद्यालयातच आत्‍महत्‍या

धनराज माळी
Saturday, 17 October 2020

नेहमीप्रमाणे सकाळी दहाला कॉलेजला आले. त्यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना आपल्या दैंनदिन कामे सोपविली. त्यानंतर ते वरचा मजल्यावर गेले. त्यांना फोनवर बोलायचे असले म्हणजे ते नेहमी वरचा मजल्यावर बोलत जात असल्‍याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

नंदुरबार : जिजामाता फॉर्मसी कॉलेजचे प्राचार्य रवींद्र शामराव चौधरी (वय ५६) यांनी कॉलेजमधील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल दुपारी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात अकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नंदुरबार येथील जिजामाता शिक्षण संस्थेच्या फॉर्मसी कॉलेजचे प्राचार्य रवींद्र शामराव चौधरी यांनी शुक्रवारी (ता.१६) दुपारी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक दोनमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ते नेहमीप्रमाणे सकाळी दहाला कॉलेजला आले. त्यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना आपल्या दैंनदिन कामे सोपविली. त्यानंतर ते वरचा मजल्यावर गेले. त्यांना फोनवर बोलायचे असले म्हणजे ते नेहमी वरचा मजल्यावर बोलत जात असल्‍याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. 

जेवणाला घरी आले नाही म्‍हणून
दुपारी ते घरी जेवायला जात असत. जेवणासाठी नेहमीच्या वेळेवर पोहोचले नाही. उशिर झाला म्‍हणून त्यांच्या पत्नीने फोन केला. मात्र त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. त्यामुळे त्यांनी कॉलेजच्या दुरध्वनीवर फोन केला. सर अद्याप जेवणासाठी आले नाहीत. कर्मचाऱ्यांनी सर त्यांचा दालनात नसल्‍याचे सांगितले. मात्र ते घरीही पोहोचले नाही. त्यामुळे गेले कुठे. कर्मचाऱ्यांनी वरचा मजल्यावर फोनवर बोलण्यासाठी गेले असावेत. असे समजून त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळेस ते वरचा मजल्यावर खोली क्रमांक दोनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ते पाहताच कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

महाविद्यालयात महत्‍त्‍वाच्या जबाबदाऱ्या
प्राचार्य रवींद्र चौधरी हे मुळचे मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शहापूर (जि. बऱ्हाणपूर) येथील रहिवासी होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. मुलगी अमेरिकेत वैद्यकीय (एम.डी.) अभ्यासक्रमाला आहे. तर मुलगा येथे इजिंनिअरिंगच्या शेवटचा वर्षाला आहे. मुलीचे नुकतेच साखरपुडा झाला होता. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. चौधरी यांचा अत्यंत मनमिळाऊ व संयमी स्वभाव होता. संस्थेच्या सर्वाधिक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांचाकडे होत्या. 

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत संस्थेचे कर्मचारी तुषार प्रभाकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राचार्य चौधरी हे जवळपास ३१ वर्षापासून कार्यरत होते. फॉर्मसी कॉलेजच्या प्रगतीत त्यांचे मोलाचे सहकार्य होते.संस्थाचालकांचे विश्‍वासू सहकारी मानले जात होते. त्यांनी आत्महत्या करावी असे कोणतेही ठोस कारण नव्हते. मात्र त्यांचे कोणाकडे तरी आर्थिक देवाण-घेवाणीतून फसवणुक झाली होती. त्यामुळे असे केले असावे, अशी चर्चा आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar principal suicide collage room