esakal | अहो आश्चर्य.. दुर्मिळ व नष्ट होणारी गिधाड आढळली एकाच ठिकाणी
sakal

बोलून बातमी शोधा

the vulture

सातपुड्यात यापूर्वीही गिधाडांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र पक्षीप्रेमींच्या नजरेत येणे ही मोठी बाब आहे. त्यामुळे गिधाडांचे संवर्धन होऊन त्यांची संख्या वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे.

अहो आश्चर्य.. दुर्मिळ व नष्ट होणारी गिधाड आढळली एकाच ठिकाणी

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले क्रिटिकली इन डेंजर झोनमध्ये गणना होत असलेले 'गिधाड' सातपुड्यातील कालीबेल (ता. धडगाव) येथे आढळून आले आहेत. एका तरुणीने त्यांचे फोटो काढत त्यांच्या उपस्थितीला बळ दिले आहे. त्यामुळे आश्चर्यासह समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सातपुड्यात यापूर्वीही गिधाडांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र पक्षीप्रेमींच्या नजरेत येणे ही मोठी बाब आहे. त्यामुळे गिधाडांचे संवर्धन होऊन त्यांची संख्या वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे.

दुर्मिळ असलेले गिधाड मृत प्राणी व जनावरांना खातात. त्यात जनावरांना देण्यात येणारी औषधे व रसायने यामुळे गिधाड ही प्रजाती आता जेमतेम नजरेस पडते. परंतु एक आश्चर्यकारक घटना घडली असून थोडके नव्हे तर चक्क 7 - 8 गिधाड एकाचवेळी एकाच ठिकाणी आढळून आली आहेत.

दिवाळीचा सुट्टीत नवी पहाट 
रत्नमाला चंद्रसिंग वळवी या पुण्यातील नॅशनल कॅमिकल लॅबोरेटरी (NCL) मध्ये नोकरीला आहेत. रत्नमाला वळवी त्यांचे मोठे भाऊ योगेश वसावे यांच्यासह दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्या सासरी कालीबेल (ता. धडगाव) येथे गेले होत्या. दरम्यान रत्नमाला वळवी यांना लहानपणापासूनच पक्षी, प्राणी बद्दल आकर्षण असल्याने त्या कालीबेलचा डोंगराळ भागात भटकंतीसाठी गेल्या, त्यावेळी त्यांना 1 - 2 नव्हे तर चक्क 7- 8 गिधाडे एकाचवेळी एकाच ठिकाणी दिसून आलीत. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले गिधाड इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसून आल्याने त्यांनी लागलीच त्यांच्या मोबाईलचा कॅमेरात त्यांची छबी कैद केली. पर्यावरणाचा दृष्टीने ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे.

गिधाडांची शेड्युल एकमध्ये गणना
गिधाडांच्या काही प्रजाती 99 टक्के तर काही 97 टक्के नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे गिधाडांची शेड्युल एक मध्ये गणना होते. अशी ही दुर्मिळ प्रजाती सातपुड्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र त्यांच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत पक्षीप्रेमींनी व्यक्त केले आहे.

खानावळ सुरु करावी
गिधाडांच्या संवर्धनासाठी वनविभागाने काही वर्षांपूर्वी सोजरबार येथे कृत्रिम खानावळ सुरु केली होती, मात्र निधीअभावी ती खानावळ बंद पडली आहे. आता कालीबेल या ठिकाणी गिधाड आढळून आल्याने सातपुड्यात गिधाडांचा नैसर्गिक अधिवास टिकून असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे वनविभागाने सोजरबार व इतर ठिकाणी खानावळ सुरु करीत, आवश्यक ते प्रयत्न केल्यास गिधाडांची संख्या निश्चित वाढू शकते.


नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली गिधाड इतक्या मोठ्या संख्येने दिसून आल्याने मला आश्चर्याचा धक्काच बसला. काकरदा (ता. शहादा) जवळ मला मोर सुध्दा दिसून आले असून सातपुड्यात इतर पक्षी देखील नजरेस पडले आहेत. त्यामुळे सातपुड्याच्या जंगलात काही प्रमाणात का होईना पण आजही पक्षी संपदा टिकून असल्याचे सिद्ध होते. त्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
- रत्नमाला वळवी, एनसीएल, पुणे.  

संपादन ः राजेश सोनवणे

loading image