अखेर ती चिमुरडी हरली; कुत्र्याच्‍या चाव्‍यानंतर आठवड्याभरापासून मृत्यूशी झुंज

धनराज माळी
Saturday, 5 December 2020

पालकांनी पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अखेर त्यांना अपयश आले. आठवडाभर सुरू असलेली बालिकेची मृत्यूशी झुंज अखेर शुक्रवारी (ता. ४) अपयशी ठरली.

नंदुरबार : येथील नेहरूनगर भागात सहा वर्षीय बालिकेला अंगणात खेळत असताना, पिसाळलेल्या कुत्र्याने तिचा चावा घेतला. यामुळे बालिका गंभीर जखमी झाली. तिच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर प्रकृती खालावल्याने सुरत येथे खासगी रुग्णालयात हलविले होते. पालकांनी पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अखेर त्यांना अपयश आले. आठवडाभर सुरू असलेली बालिकेची मृत्यूशी झुंज अखेर शुक्रवारी (ता. ४) अपयशी ठरली. तिने सुरत येथे रुग्णालयात प्राण सोडला. ही घटना साऱ्यांचे हृदय पिळवणारी आहे. 
दरम्यान, मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढल्याने या चिमुकलीला जीव गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 
शहरातील नेहरूनगरमधील मुकेश महाजन यांची कन्या हिताक्षी (वय ६) सात दिवसांपूर्वी अंगणात खेळत असताना, पिसाळलेल्या कुत्र्याने हिताशीवर हल्ला चढविला. तिच्या तोंडाला, मानेला कडकडून चावा घेत तिला अक्षरशः काही अंतरापर्यंत ओढून नेत लचके तोडत होता. ती रडू लागली. काही नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी कुत्र्याला हुसकावले. मात्र, हुसकावणाऱ्यांच्या मागे तो कुत्रा लागला. नागरिकांनी त्याला घेरल्यावर मुलीला सोडले. मात्र, तिचा गालासह शरीरावर बऱ्याच ठिकाणी त्याने चावा घेतल्याने बालिका गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत हिताशीला तिचे वडील मुकेश महाजन व नागरिकांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेले. बालिकेची परिस्थिती पाहून डॉक्टरही विचारात पडले. त्यांनी तत्काळ रॅबिजचे इंजेक्शन व पुढील उपचार सुरू केले. मात्र, तिचा प्रकृती खालावत गेली. दोन दिवसांनतर डॉक्टरांनी तिला सुरतला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, बालिकेला सुरतच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अपयश आले. अखेर हिताशीने शुक्रवारी दुपारी सुरतला उपचारदरम्यान प्राण सोडला. 

माळी समाजावर शोककळा 
हिताशी सर्वांची आवडती, ती पप्पांची लाडली होती. साऱ्या गल्लीत ती टुनूटुनू फिरत असायची. तिचा बळी कुत्र्याने घेतला. ही घटना साऱ्यांनाच चटका लावणारी आहे. या घटनेमुळे माळी समाजावर शोककळा पसरली आहे. 

सायंकाळी अंत्यसंस्कार 
हिताशीचा मृतदेह सायंकाळी नंदुरबारला आणण्यात आला. तिच्‍यावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. यानिमित्त पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे अनेकांनी पालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

‘त्या’ कुत्र्याचा सहा जणांना चावा 
‘त्या’ पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच दिवशी त्या परिसराल एका ७० वर्षीय वृद्धेसह सहा जणांना चावा घेतला. त्यांचावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar six year girl death in dog bite