नंदुरबारात जिल्ह्यातील सात लाख जनावरांना लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण  

धनराज माळी
Thursday, 3 September 2020

जिल्ह्यातील शंभर टक्के जनावरांची ओळख पटविण्यासाठी कानात लावावयाचे टॅग व ॲपलिकेटरही या मोहिमेंतर्गत लावण्यात येणार आहेत.

नंदुरबार : जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत ‘लाळ-खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील पशुपालकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. 
 

लाळखुरकत हा पशुधनातील विषाणूजन्य रोग आहे. या रोगास लाळ्या, तोंडखुरी, पायखुरी असेही म्हणतात. प्रामुख्याने हा रोग पायात द्विखुरी असलेल्या जनावरामध्ये आढळतो. या रोगाचा प्रसार हवेवाटे, हवा वाहणाऱ्या दिशेने, कळपातल्या कळपात बाधित जनावरांमुळे, जनावरांची पाणी प्यावयाची जागा, गव्हाणी व लागणारी भांडी, गुरांचे बाजार, आठवडी बाजार, जत्रा, पशुप्रदर्शने, साखर कारखाने, इत्यादी ठिकाणांहून अधिक प्रमाणात होतो. 

या रोगामुळे जनावंरामधील मृत्यूदर जरी कमी असला, तरी रोगाचा प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्याने गाई- म्हशींचे दूध देणे कमी होते. तसेच शेतीकाम, ओढकामासाठी वापरण्यात येणाऱ्या बैलांमध्ये अशक्तपणा येऊन शारीरिकदृष्ट्या कमकुवत होऊन बैलांपासून होणाऱ्या शेतीकामास व ओढकामास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तसेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील शंभर टक्के पशुधनास लसीकरण करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात सात लाख पशुधन 
जिल्ह्यात सुमारे सात लाख पशुधन आहे. त्यात गायवर्ग ३ लाख ३६ हजार नऊशे सात, म्हैसवर्ग ७२ हजार १००, शेळ्या २ लाख ७२ हजार सातशे त्र्येपन्न, मेंढ्या १५ हजार दोनशे शहात्तर असे एकूण ६ लाख ९७ हजार छत्तीस पशुधनास सहा महिन्यांच्या अंतराने वर्षांतून २ वेळा लसीकरण करावयाचे आहे. यासाठी पहिल्या फेरीसाठी जिल्ह्यास ३ लाख ४१ हजार लसी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील शंभर टक्के जनावरांची ओळख पटविण्यासाठी कानात लावावयाचे टॅग व ॲपलिकेटरही या मोहिमेंतर्गत लावण्यात येणार आहेत. पशुपालकांनी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क साधून कळपातील ४ ते ६ महिन्यांवरील सर्व जनावरांना लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण करावे, असे आवाहन केले आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar special vaccination campaign for seven lakh animals will be held