esakal | माणूस मेला तर मिळत नाही तिरडी अन स्मशानभूमी, गावाची का आहे अशी विचीत्र भूमीका !   
sakal

बोलून बातमी शोधा

माणूस मेला तर मिळत नाही तिरडी अन स्मशानभूमी, गावाची का आहे अशी विचीत्र भूमीका !   

आदिवासींच्या रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार दफनविधी करूनच केले जातात. यामुळे इतर समाजाच्या लोकांची मात्र कुचंबना होते.

माणूस मेला तर मिळत नाही तिरडी अन स्मशानभूमी, गावाची का आहे अशी विचीत्र भूमीका !   

sakal_logo
By
संजय मिस्तरी

वडाळी (जि. नंदुरबार)ः विविध योजनेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास होत असताना गावात कायमस्वरूपी तिरडी नाही यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण खापरखेडा गावाबाबत मात्र हे सत्य आहे. मृताच्या कुटुंबीयांना मात्र यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोट्यवधींचा निधी येऊनही साधी तिरडी खरेदी केली जात नाही यामागे केवळ भिती आणि अंधश्रध्दा असल्याचे सांगण्यात येते. 

 
खापरखेडा हे जिल्ह्याच्या टोकावरचे शेवटचं, आदिवासी वस्ती असलेले साडेसातशे लोकसंख्येचे गाव. आदिवासींच्या रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार दफनविधी करूनच केले जातात. यामुळे इतर समाजाच्या लोकांची मात्र कुचंबना होते. गावात लोखंडी तिरडी नसल्याने कोंढावळ, काकर्द या गावातून उसनवारीने आणावी लागते. गावात तिरडी असली की ते संकट येत राहते या भितीपोटी ती नकोच अशी भूमिका आतापर्यत घेण्यात आली आहे.

उसनवारीची वेळ आली तरी चालेल

गावात स्थानिक स्वराज्य संस्था व काही शिकलेल्या तरुणांनी तिरडीबाबत ग्रामस्थांचा गैरसमज दूर केला मात्र तिरडी गावात नकोच अशी समजूत झाली आहे यासाठी उसनवारीची वेळ आली तरी चालेल पण अमरधाम व तिरडी नकोच अशी येथील लोकांचे म्हणणे आहे. 

अमरधाम व तिरडीसाठी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत मागणी केलेली आहे, त्यासंबंधीचा प्रस्ताव करून वरिष्ठ पातळीवर दाखल करण्यात आलेला आहे निधी उपलब्ध झाल्यास तात्काळ तिरडी खरेदी केली जाईल व अमरधमाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल. 

 प्रदीप पाटील, ग्रामसेवक, खापरखेडा. 

गावात अमरधाम, तिरडी कायमस्वरूपी राहण्यासाठी ग्रामसभेमध्ये अनेक वेळा चर्चा झाली. काही ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे हा विषय बाजूला ठेवला, मात्र अनेक वेळा गावात दुर्दैवी घटना घडल्यानंतर तिरडी अमरधाम नसल्याने पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो 
 शेनीबाई भील, सरपंच, ग्रामपंचायत खापरखेडा. 

तिरडीबाबत ग्रामस्थांमध्ये असलेला समज ही केवळ अंधश्रध्दा आहे. याबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करू. त्यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तिरडी असण्याचा आणि संकटांचा काहीही संबंध नाही हे पटवून देऊ. यासाठी प्रशासनालाही बरोबर घेऊन गैरसमज दूर करू. 
-रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, नंदुरबार.
 

संपादन - भूषण श्रीखंडे