शैक्षणिक गुणवत्ता ठरविण्यासाठी नंदुरबार ‘डायट’चा अभ्यासदौरा 

धनराज माळी
Saturday, 14 November 2020

दुर्गम भागातील बालकांसाठी शिक्षणाच्या उपलब्ध संधी अधिक प्रभावी करून देण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील,

 नंदुरबार  : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), नंदुरबार द्वारा नंदुरबार जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकासाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तोरणमाळ परिसरात दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यामध्ये लेगापानी, कुंड्या, गण्यारचापडा, खडकी या आदिवासी भागातील दुर्गम गावांना प्रत्यक्ष गृहभेटी देण्यात आल्या. 

आवश्य वाचा- राज्यातील वीज कर्मचारी संपावर जाणार -

या दौऱ्यामध्ये स्थानिक पदाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादी घटकांच्या भेटी घेण्यात आल्या. भेटीदरम्यान दुर्गम भागातील विविध समस्या, विविध शैक्षणिक संकल्पना, स्थलांतर, विद्यार्थी उपस्थिती, ऑनलाइन - ऑफलाईन शिक्षणाची स्थिती, बालरक्षक शिक्षकांचे कार्य, शिक्षणाच्या सोयी- सुविधा, विद्यार्थ्यांचा आहार, स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न, अध्ययन निष्पत्ती, प्रशिक्षणाची स्थिती व आवश्यकता इत्यादी विषयाबाबत त्या- त्या बाबींशी संबंधित व्यक्तींशी तपशीलवार चर्चा करण्यात आली. दुर्गम भागातील बालकांसाठी शिक्षणाच्या उपलब्ध संधी अधिक प्रभावी करून देण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील, याविषयी संबंधितांची मते जाणून घेण्यात आली. 

दौऱ्यात संपूर्ण स्थितीचे निरीक्षण व अभ्यासाअंती या भागासाठी विशेष शैक्षणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता प्राचार्य डॉ. भटकर यांनी व्यक्त केली. अभ्यास दौऱ्यामध्ये संस्थेचे अधिव्याख्याता बी. आर. पाटील, डॉ. संदीप मुळे, शिक्षण विस्तार अधिकारी योगेश सावळे, विषय सहायक प्रकाश भामरे, तसेच विषय साधन व्यक्तीचा सहभाग होता. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Study tour of Nandurbar ‘Diet’ to determine the quality of education