कोरोना फायटर म्हणून झाला सन्मान... आणि आज लाच घेतांना झाली अटक ! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

पाच दिवसापूर्वी डॉ. कोकणी याचा कोरोना मध्ये चांगले काम करीत असल्याने त्यांचा "कोरोना' फायटर म्हणून सन्मान एका संस्थेने केला.

नंदुरबार : गरोदर मातांच्या सोनोग्राफी तपासणीचा करार झालेल्या शासकीय मान्यताप्राप्त सोनोग्राफी सेंटरचालकाकडून प्रती पेशंट 50 रुपयांप्रमाणे 50 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी नवापूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्‍चंद्र टिकाराम कोकणी यांना आज खांडबारा येथे पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने भरभक्कम रकमेची लाच मागितल्याची ही तिसरी घटना आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील तक्रारदार यांच्या मालकीचे शासकीय मान्यताप्राप्त सोनोग्राफी सेंटर नवापूरमध्ये आहे. त्याची कायदेशीर नोंद झाली आहे. शासकीय योजनेंतर्गत 18 सप्टेंबर 2018 पासून या केंद्रात गरोदरमातांची तपासणी केली जाते. त्याचा मोबदला न घेता शासकीय दर प्रतिपेशंट मागे 400 रुपये मानधनावर तपासणी करण्याचा करार आरोग्य विभागाने या सेंटरशी केलेला आहे. या काळात तपासणी झालेल्या एकूण 1 हजार 513 पेशंटमागे डॉ. कोकणी यांनी 50 रुपये याप्रमाणे 76 हजार 50 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ती 50 हजार रुपये निश्‍चित झाली होती. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आज नवापूर येथे पंच व साक्षीदारांच्या समक्ष श्री. कोकणी यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल अहिरराव, हेडकॉन्स्टेबल उत्तम महाजन, संजय गुमाने, मनोहर बोरसे, दीपक चित्ते, मनोज अहिरे, अमोल मराठे व महिला पोलिस ज्योती पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

पाच दिवसापूर्वी झाला सन्मान 
पाच दिवसापूर्वी डॉ. कोकणी याचा कोरोना मध्ये चांगले काम करीत असल्याने त्यांचा "कोरोना' फायटर म्हणून सन्मान एका संस्थेने केला. परंतू आज याच कोरोना फायटरला लाच घेतांना अटक झाल्याने नंदूरबार शहरात एकच खळबळ उडाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Taluka Health Officer Arrested while taking bribe